बियाण्याचा दोष नाही हो.. मग टोमॅटोवर हा कशाचा परिणाम?

आनंद गायकवाड
मंगळवार, 30 जून 2020

संगमनेर तालुक्‍याच्या प्रवरा पट्ट्यातील पश्‍चिम भागात उन्हाळी टोमॅटोची लागवड केली जाते. तालुक्‍यातील निमज, निमगाव बुद्रुक, पेमगिरी, नांदुरी, सांगवी, तसेच पूर्व भागातील ओझर व रहिमपूर हा परिसर टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या पट्ट्यात नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान उन्हाळी टोमॅटोची लागवड केली जाते.

संगमनेर : संगमनेर तालुक्‍यात मध्यंतरी नगदी पीक असलेल्या टोमॅटोवर झालेल्या विषाणूजन्य रोगामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. याबाबत शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत, फळ व बियाणांचे नमुने बंगळुरू येथील अखिल भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेत विश्‍लेषणासाठी पाठविले होते. तेथील तज्ज्ञांनी या विषाणूच्या प्रसाराला मावा ही कीड कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे.

संगमनेर तालुक्‍याच्या प्रवरा पट्ट्यातील पश्‍चिम भागात उन्हाळी टोमॅटोची लागवड केली जाते. तालुक्‍यातील निमज, निमगाव बुद्रुक, पेमगिरी, नांदुरी, सांगवी, तसेच पूर्व भागातील ओझर व रहिमपूर हा परिसर टोमॅटो उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या पट्ट्यात नोव्हेंबर ते एप्रिलदरम्यान उन्हाळी टोमॅटोची लागवड केली जाते.

हेही वाचा : साहेब काही तरी बघा, मोदींचे पैसे येईनात.. 

तालुक्‍याच्या पठार भागात मात्र साधारण जूनमध्ये पावसाळी टोमॅटोची लागवड होते. त्यामुळे सुमारे 3 हजार हेक्‍टरवरील टोमॅटो बाराही महिने बाजारात उपलब्ध असतात. 

शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी 

शेतकऱ्यांच्या हाती नगदी पैसा देणारे हे पीक मध्यंतरी विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जवळपास नष्ट झाले होते. जानेवारी ते मार्च-2020 या काळात शेतकऱ्यांनी "आयुषमान' वाणाची लागवड केली. मात्र, फळ कडक होणे व न पिकणे, त्यावर पांढरे, पिवळसर, हिरवे चट्टे दिसणे, अर्धवट पिकणे, फळांचा आकार बदलणे, पिवळी पडून सुरकुत्या पडणे, झाडाचे शेंडे पिवळे पडणे, फळे लुसलुसीत होणे, पाने वाकडी होणे, अशा प्रकारच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या होत्या. 

कुकुम्बर मोझॅक व्हायरसचे प्रमाण अधिक 

तक्रारीच्या अनुषंगाने एप्रिल, मे महिन्यात या फळांचे नमुने बंगळुरू येथील अखिल भारतीय फलोत्पादन संशोधन संस्थेत विश्‍लेषणासाठी पाठवले होते. तपासणीअंती या पिकावर मावा कीडीमुळे होणारा 6 विषाणूंचा प्रादुर्भाव आढळला. त्यात कुकुम्बर मोझॅक व्हायरसचे प्रमाण अधिक होते. मात्र, बियाणे तपासणीच्या 2 जून रोजी मिळालेल्या अहवालात ते बियाणे व्हायरससाठी निगेटिव्ह विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणे अवघड असल्याने हे पीक दुरुस्त होणे अवघड असते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला. 

कृषी विभागाने सुचविलेल्या उपाययोजना 

नवीन लागवड करताना कीटकरोधीत नेटमधील 20 ते 28 दिवसांची रोपे वापरावीत, विभागवार शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी, झाडांची प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी शिफारस केलेली खते व संजीवकांच्या मात्रा वापराव्यात, खते व औषधांचा अनियमित वापर टाळावा. वाफसा बघून सकाळी आवश्‍यकतेनुसार पाणी द्यावे, विषाणूंची साखळी तोडण्यासाठी एकपीक पद्धतीचा वापर करावा.

रोगप्रतिकारक्षमता टिकविण्यासाठी जैविक औषधे, कीड व रोगनाशकाचा अतिवापर टाळावा. बांधावरही फवारणी करावी. तणाचा बंदोबस्त करुन स्वच्छता ठेवावी, अशा उपाययोजना कृषी विभागाने सुचवल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांना मावा नियंत्रणाचे प्रशिक्षण दिले गेले. 

माव्याचा परिणाम यंदाच कसा? 

मावा हा कीटकजन्य रोग प्रत्येक वर्षी ऊस व घास पिकांवर हिवाळ्यात सातत्याने पडतो. मात्र, असे असताना माव्याचा परिणाम दरवर्षी दिसायला हवा. याच वर्षी माव्याचा परिणाम टोमॅटोवर कसा झाला, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. खासगी कंपन्यांनी याचा पुरावा देवून शेतकऱ्यांचे समाधान करणे किंवा या प्रश्नाचा उलगडा कृषी विभागाने करणे आवश्‍यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is nothing wrong with tomato seeds