
हरिश्चंद्रगडावरील मंदिरातील चोरी झालेल्या विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्ती अखेर सापडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. एकादशीच्या मुहुर्तावर स्वत: चोरानेच मंदिरात विठ्ठलाची मूर्ती आणून ठेवली. रुख्मिणीची मूर्ती यापूर्वीच सापडली.
अकोले (अहमदनगर) : हरिश्चंद्रगडावरील मंदिरातील चोरी झालेल्या विठ्ठल-रुख्मिणीच्या मूर्ती अखेर सापडल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. एकादशीच्या मुहुर्तावर स्वत: चोरानेच मंदिरात विठ्ठलाची मूर्ती आणून ठेवली. रुख्मिणीची मूर्ती यापूर्वीच सापडली.
ती पोलिस पाटील बारकू भारमल यांच्या ताब्यात आहे. आता दोन्ही मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती वन समितीचे अध्यक्ष चंदर भारमल यांनी दिली. दरम्यान, विठ्ठल-रुख्मिणीची मूर्ती सापडली असली, तरी चोरांचा तपास करीत असल्याचे राजूर पोलिसांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मागील महिन्यात हरिश्चंद्रगडावरील मंदिरातून चोरांनी विठ्ठल-रख्मिणीची मूर्ती लांबवली होती. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या होत्या. दुसरीकडे, पुरातत्व खात्याने आमचा या मूर्तीशी संबंध नसल्याचे म्हणत फिर्याद देण्यास नकार दिला. मात्र, त्यानंतरही राजूर पोलिस या घटनेचा तपास करीत होते. ग्रामस्थही मूर्तींचा शोध घेत होते. अखेर आधी रुख्मिणीची मूर्ती हाती लागली. पोलिस पाटील बारकू भारमल यांच्या ताब्यात मूर्तीला देण्यात आले.
एकादशीचा मुहूर्त साधून चोरांनी मंदिरात विठ्ठल मूर्ती आणून ठेवली. ग्रामस्थ आज सकाळी गेले असता, त्यांना मूर्ती आढळून आली. ग्रामस्थांनी याबाबत पोलिस पाटलांना कळविले. सध्या विठ्ठल मूर्ती गडावर, तर रुख्मिणी मूर्ती गडाच्या पायथ्याशी पाचनाई गावात असून, सोमवारी त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. स्थानिक वादातून हा प्रकार झाल्याची चर्चा आहे.
संपादन : अशोक मुरुमकर