नगरमध्ये तेरा लाख जनावरांना मिळाली ओळख

दौलत झावरे
Saturday, 19 December 2020

मागील वर्षाच्या शिल्लक लसीतून जिल्ह्यातील सर्व जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. एकूण 13 लाख सात हजार 394 जनावरांच्या कानांना टॅग लावून लाळ-खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

नगर ः केंद्र सरकारच्या पशुसंजीवनी योजनेंतर्गत व राष्ट्रीय रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनावरांच्या कानांना 12 अंकी टॅगिंग व ऑनलाइन नोंदणीत नगर जिल्ह्याने घेतलेली आघाडी कायम आहे. 

राष्ट्रीय रोगनियंत्रण कार्यक्रमांतर्गत जनावरांना टॅग, लसीकरण लाळ्या-खुरकुताचे लसीकरण सुरू आहे. जिल्ह्यात 14 लाख 80 हजार गाय-वासरे, दोन लाख 31 हजार म्हशी, अशी सुमारे 16 लाख जनावरे आहेत. त्यांच्यासाठी लाळ्या-खुरकूत लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी लसही उपलब्ध झाली आहे.

मागील वर्षाच्या शिल्लक लसीतून जिल्ह्यातील सर्व जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. एकूण 13 लाख सात हजार 394 जनावरांच्या कानांना टॅग लावून लाळ-खुरकूत रोगप्रतिबंधक लसीकरण करण्यात आले आहे.

इनाफ प्रणालीवर लसीकरणाची चार लाख 55 हजार 557 व टॅगिंगची सहा लाख 16 हजार 276, तसेच रोज लसीकरण होणाऱ्या नऊ हजार 582 जनावरांची ऑनलाइन नोंदणी होत आहे. लसीकरणासह ऑनलाइन नोंदणीमध्ये जिल्ह्याने सुरवातीपासूनची आघाडी कायम ठेवली आहे. 

हेही वाचा - आमदार नीलेश लंके यांचा निर्णय एका गावापुरता नाही

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून यासंदर्भात रोज आढावा घेतला जात आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख लक्ष ठेवून आहेत. त्यामुळेच जिल्ह्याची आघाडी कायम आहे. 

मुदतवाढीची गरज 
लाळ्या-खुरकूत लसीकरण व ऑनलाइन नोंदणीसह टॅगिंगच्या प्रक्रियेसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. या मुदतीत वाढ होणे गरजेचे आहे, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे. 
 

जनावरांच्या कानांना टॅग लावल्याने पशुपालकांना फायदा होणार आहे. जिल्ह्याने राज्यात सुरवातीपासून घेतलेली आघाडी कायम ठेवली आहे. 
- सुनील गडाख, सभापती, पशुसंवर्धन समिती , अहमदनगर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thirteen lakh animals were identified in Ahmednagar