esakal | थोरात कारखान्याने थेट तैवानहून आणला अॉक्सीजन प्लँट
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब थोरात

थोरात कारखान्याने थेट तैवानहून आणला अॉक्सीजन प्लँट

sakal_logo
By
आनंद गायकवाड

संगमनेर ः तालुक्‍यातील कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने विविध रुग्णालयात दाखल असलेल्या अत्यवस्थ रुग्णांना गेल्या काही दिवसांपासून ऑक्‍सिजनचा तुटवडा भासत आहे. या पार्श्वभुमिवर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यातर्फे नुकतेच 500 खाटांचे कोविड सेंटर सुरू केले.

हे सेंटर व इतर रुग्णालयांकरिता लागणाऱ्या ऑक्‍सिजनसाठी कारखान्यातर्फे तातडीने तैवान येथून स्कीड माऊंटेड ऑक्‍सिजन प्लांटची खरेदी केली. पंधरा दिवसात हा ऑक्‍सिजन प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली.

ते म्हणाले, की राज्याच्या महसूल विभागाची महत्वाची जबाबदारी सांभाळताना मंत्री थोरात यांनी संगमनेर तालुक्‍याचे पालक असल्याची भुमिकाही तितक्‍याच समर्थपणे निभावली आहे. तालुक्‍यात ऑक्‍सिजन, औषधे यासह चांगल्या सुविधा देण्यावर त्यांचा भर आहे.

हेही वाचा: पारनेरच्या आमदारांना थेट शरद पवार यांचा फोन

कोरोना रुग्णांची माहिती घेण्यासाठी घरोघर तपासणी अभियान सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यासह तालुक्‍यातील ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरुन त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याचे पुढचे पाऊल म्हणून कारखाना व्यवस्थापनाने तालुक्‍यातील रुग्णांची ऑक्‍सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी तैवान येथून स्किड माऊंटेड ऑक्‍सिजन प्लांट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

आगामी 15 दिवसात या प्रकल्पाची उभारणी पूर्ण होणार असून, या प्रकल्पातून रोज 1 टन 190 किलो ऑक्‍सिजन निर्मिती होणार आहे. त्यातून 7 घनमीटर क्षमतेचे 85 सिलींडर दररोज भरले जाणार आहेत. यामुळे आगामी काळात कोवीड सेंटर तसेच इतर रुग्णालयांकरता होणारा ऑक्‍सिजन पुरवठा सुरळीत होणार असल्याने, हा उपक्रम राज्याला दिशादर्शक ठरणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी कोरोना संकटात कृतिशीलतेतून अनेक धोरणात्मक निर्णय घेताना नागरिकांना दिलासा दिला आहे.

याचबरोबर स्वतःचे एक वर्षाचे मानधनही मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. तसेच अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांमधील पाच हजार कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा खर्चही मुख्यमंत्री सहायता निधीला दिला जाणार आहे. ऑक्‍सिजन प्लांटचा हा उपक्रम राज्याला आदर्शवत ठरणार असून, या निर्णयाबद्दल कारखान्याचे मार्गदर्शक बाळासाहेब थोरात, अध्यक्ष बाबा ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे तसेच सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांचे सहकार्य लाभत आहे.

loading image