कोपरगावातून तीन दिवस किसान स्पेशल एक्स्प्रेस

मनोज जोशी
Sunday, 25 October 2020

दर मंगळवार, गुरुवार व शनिवार असे दिवस ही रेल्वे धावेल, अशी माहिती स्टेशन मास्तर एच. एल. मीना यांनी दिली.

कोपरगाव - कोरोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होऊ लागला आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र शासनाने शेतीमाल शहरात पाठवण्यासाठी कोपरगाव रेल्वे स्थानकातून किसान स्पेशल एक्सप्रेसची सोय केली आहे.

दर मंगळवार, गुरुवार व शनिवार असे दिवस ही रेल्वे धावेल, अशी माहिती स्टेशन मास्तर एच. एल. मीना यांनी दिली.

ते म्हणाले, ही किसन स्पेशल एक्सप्रेस कोपरगाव होऊन दानापूर मुजफ्फरपूर बिहार येथे शेतीमाल घेऊन जात आहे शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल कोपरगाव रेल्वे स्थानकात बुकिंग करावा त्यावर शेतकऱ्यांना 50 टक्के सबसिडी भाड्यामध्ये दिली जात आहे.

शेतकऱ्यांना ही आनंदाची बातमी अाहे. त्यांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या कोपरगाव रेल्वे स्थानकातून गोवा निजामुद्दीन एक्सप्रेस पुणे, दानापुर एक्सप्रेस कोल्हापूर, गोंदिया, महाराष्ट्र एक्सप्रेस हुबळी, वाराणसी एक्सप्रेस कर्नाटका, बेंगलोर दिल्ली एक्सप्रेस व पुणे गोरखपुर एक्सप्रेस अशा सहा गाड्या दिवाळी सणाच्या प्रवासी सेवेसाठी सुरू झाल्या आहेत.

कोपरगाव रेल्वे स्थानक हे शिर्डीला जोडले गेल्याने येवला ते कोपरगाव अशी डबल रेल्वे लाईन सुरू झाली आहे. येवले ते अंकाईपर्यंत डबल रेल्वे मार्गाचे काम पूर्णत्वास गेले आहे. आता अंकाई ते अंकाई किल्ल्यापर्यंत काम सुरू आहे. कोपरगाव रेल्वे स्थानकावर एक व दोन प्लॅटफॉर्मवर एलईडी लाइटिंगचे काम पूर्ण झाल्याने स्टेशनच्या सुशोभिकरणात भर पडली आहे.

कोपरगाव येथील गुंड शेडचे कॉंक्रिटीकरणचे काम प्रगतिपथावर आहे. वाढती गर्दी लक्षात घेता व गाड्यांची ये-जा वाढल्याने स्टेशनवर लूप लाईनचे काम केले जाणार आहे. 2 व 3 या प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण केले जाणार आहे. किसान स्पेशल एक्सप्रेसमध्ये शेतकऱ्यांचे सध्या डाळिंब निर्यातीचे काम सुरू झाले आहे.

इतरही माल शेतकरी त्याद्वारे बुकिंग करून नेऊ शकतात त्यासाठी 50 टक्के भाड्यात सबसिडी दिली जात आहे. साईभक्तांसाठी व रेल्वे प्रवाशांसाठी जास्तीत जास्त सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी स्थानिक रेल्वे स्थानक रेल्वेस्थानक समिती'चे अध्यक्ष व राज्य व खत बी-बियाणे चे माजी अध्यक्ष कैलास चंद्र ठोळे हे सातत्याने केंद्र व राज्य शासन स्तरावर सतत लेखी पाठपुरावा करत असतात. त्यांनीही या किसान स्पेशल एक्सप्रेसचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा म्हणून आवाहन केले आहे.

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three day Kisan Special Express from Kopargaon