आमदार काळे यांच्या मागणीवरुन अजित पवारांनी शिर्डी विमानतळाला दिले ३०० कोटी

सतिश वैजापूरकर
Tuesday, 29 December 2020

शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी तिनशे कोटी रूपये उपलब्ध करून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

शिर्डी (अहमदनगर) : शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी तिनशे कोटी रूपये उपलब्ध करून देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या मागणीवरून मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

राज्य सरकार पुढील दोन वर्षात टप्प्या टप्प्याने हा निधी देईल. दोनशे कोटी रुपये राज्य सरकार व अन्य मार्गांनी शंभर कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील. विमानतळ विस्ताराच्या दृष्टीने हा महत्वपूर्ण निर्णय झाला आहे, अशी माहिती विमानतळाचे संचालक दीपक शास्त्री यांनी दिली. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ते म्हणाले, की मंत्रालयात पार पडलेल्या या बैठकीस आमदार आशुतोष काळे, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, वित्त विभाग सचिव मित्तल, महसूल विभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर, सामान्य प्रशासन विभाग प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, तर नगर येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व स्वतः आपण सहभागी झालो होतो.

हेही वाचा : आई वडीलांबरोबर गेलेल्या मुलाचा सेल्फीच्या नादात शेवाळावरुन पाय घसरुन पडून मृत्यू
या बैठकीत आमदार आशुतोष काळे यांनी शिर्डी विमानतळाच्या विविध समस्यांकडे उपमुख्यमंत्री पवार यांचे लक्ष वेधून काही मागण्या केल्या. त्यात कार्गो सेवा सुरू करण्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावास शासनाने शिफारस द्यावी. सल्लागार समिती नेमून प्रोजेक्‍ट रिपोर्ट तयार करून घ्यावा.

विमानतळाशेजारील जमीन नवीन भूसंपादन कायद्यानुसार संपादन करून शेतकऱ्यांना त्या जमिनीचा योग्य मोबदला द्यावा. या विमानतळाचे श्रीसाईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ असे नामांतर करावे. कंत्राटी पद्धतीने कामावर असलेल्या कामगारांना सेवेत कायम करण्यात यावे. या मागण्यांस उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करणे, विमानतळासाठी 200 कोटी रुपये व इतर माध्यमातून 100 कोटी रुपये, असे एकूण 300 कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. तसेच काकडी ग्रामपंचायतीच्या थकीत मालमत्ता कराबाबत देखील लवकरच धोरणात्मक निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

मार्च महिन्यापासून शिर्डी विमानतळावरून रात्रीची विमानसेवा सुरू होईल. त्यानंतर हवाईसेवा झपाट्याने वाढेल. अशा काळात विमानतळावर विस्तारीकरणाची कामे करणे आवश्‍यक होते. गरजेच्या वेळी निधी उपलब्ध होईल. त्यामुळे शिर्डी विमानतळाचा विस्तार वेगाने होईल. हे आजच्या बैठकीचे फलीत म्हणावे लागेल. 
- दीपक शास्त्री, संचालक, शिर्डी विमानतळ 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred crore will be provided for the development of Shirdi Airport