डॉ. कांकरिया प्रकरणातून माजी आमदार कर्डिलेंसह तिघे सुटले

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 10 December 2020

नगरमधील नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी भिंगारजवळ 23 एकर जमीन खरेदी करण्यासाठी सुमारे 92 लाख रुपये शिवाजी व प्रकाश कर्डिले यांना दिले होते.

नगर ः भिंगार येथील जमीन खरेदी व पिस्तुलाने धाक दाखविल्याप्रकरणी शहरातील डॉ. प्रकाश कांकरिया यांना फसविणे व धमकावल्याप्रकरणी माजी आमदार शिवाजी कर्डिले तसेच प्रकाश कर्डिले व अनिल कर्डिले यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले होते.

या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली. यात तीनही आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्‍वासार्ह नसल्याच्या कारणाने निर्दोष मुक्तता केली आहे. 

नगरमधील नेत्रतज्ज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया यांनी भिंगारजवळ 23 एकर जमीन खरेदी करण्यासाठी सुमारे 92 लाख रुपये शिवाजी व प्रकाश कर्डिले यांना दिले होते. मात्र शिवाजी व प्रकाश कर्डिले यांनी ही जमीन दुसऱ्यांनाच विकल्याचे निर्दशनास आले असल्याचे डॉ. कांकरिया यांचा दावा होता.

हेही वाचा - नगरमध्ये बहरलीय गांजाची शेती

या संदर्भात शिवाजी कर्डिले यांच्या घरी जाऊन डॉ. कांकरिया यांनी विचारणा केली असता शिवाजी कर्डिले यांनी पिस्तूल दाखवून धमकावले. या वेळी प्रकाश कर्डिले हेही तेथे उपस्थित होते. प्रकाश कर्डिले यांचा मुलगा अनिल कर्डिले हे पुरावे नष्ट करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना पकडले, असा आरोप कांकरिया यांनी ठेवला होता. 

या प्रकरणावर जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यात कांकरिया यांच्याकडून ऍड. प्रकाश कोठारी यांनी बाजू मांडली. शिवाजी कर्डिले यांच्याकडून ऍड. विश्‍वासराव आठरे पाटील यांच्यासह ऍड. रघुनाथ मुरुमकर, तर प्रकाश व अनिल कर्डिले यांच्याकडून ऍड. सुधीर बाफना यांनी बाजू मांडली.

सर्व उपलब्ध पुरावे व साक्षीदार तपासून न्यायालयाने तीनही आरोपींना सबळ पुराव्याअभावी व साक्ष विश्‍वासार्ह नसल्याच्या कारणाने निर्दोष सोडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three innocents, including MLA Shivaji Kardile