रणी दौंडले वीर मराठे सात, जम्मूत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

च्ंद्रभान झरेकर
Tuesday, 26 January 2021

पवार यांच्या या कामगिरीबद्दल सेनाप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी सेनादिनाचे औचित्य साधून शौर्यपदक प्रदान करून त्यांचा गौरव केला.

नगर : जम्मू कडाक्‍याच्या थंडीने गारठले होते. मात्र, "फोर मराठा बटालियन'चे सात मावळे डोळ्यात तेल घालून भारत-पाक नियंत्रणरेषेवर लक्ष ठेवून होते. या बटालियनचे नेतृत्व कमांडींग हवालदार विकास वसंत पवार (मूळ रा. डोंगरगण, ता. नगर) यांच्याकडे होते.

अचानक भारतात घुसखोरी करण्याच्या उद्देशाने पाच जणांनी नियंत्रणरेषा ओलांडून प्रवेश केला. ही बाब विकास पवार यांच्या नजरेतून सुटली नाही.

अंगात वीरश्री संचारलेल्या पवार यांच्या गोळीबाराने आसमंत दणाणला. तिघांचा जागीच खात्मा झाला. नगरच्या या मर्द मराठा मावळ्याला घाबरून दोघांनी आल्या पावली पळ काढला. या बहादुरीबद्दल सेनाप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी सेनादिनानिमित्त (ता. 15) पवार यांचा शौर्यपदकाने गौरव केला. 

हेही वाचा - राहाता येथील अधिकाऱ्यास राष्ट्रपती पुरस्कार

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर "सकाळ'शी बोलताना पवार म्हणाले, ""सैन्य दलात विशेष ऑपरेशनची संधी लवकर कोणाला मिळत नाही. आम्हाला ती संधी मिळाली आणि आम्ही त्याचे सोने केले. आमच्या सात जणांच्या तुकडीचे नेतृत्व मी करीत होतो. 31 डिसेंबर 2019 रोजी जम्मूतील पुंज येथील नियंत्रणरेषेवरून काही घुसखोर भारतात प्रवेश करीत असल्याची खबर मिळाली होती. त्यामुळे आमचे नियंत्रणरेषेवर बारकाईने लक्ष होते.

मध्यरात्री पाच जण सीमारेषा ओलांडून भारतात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याचे लक्षात येताच, मी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्यात तिघांना कंठस्नान घालण्यात यश आले. दोघांनी घाबरून पळ काढला. भारतात घुसखोरीचा त्यांचा प्रयत्न फसला.'' 

पवार यांच्या या कामगिरीबद्दल सेनाप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांनी सेनादिनाचे औचित्य साधून शौर्यपदक प्रदान करून त्यांचा गौरव केला.

तीन पिढ्यांचा वारसा

विकास यांचे वडील वसंत पवार व त्यांचे आजोबा तुळशीराम पवार यांनीही लष्करात राहून देशसेवा केली. आजोबा तुळशीराम पवार यांनी 1962चे भारत-चीन युद्ध, तसेच 1971च्या भारत-पाक लढाईत उत्कृष्ठ कामगिरी केली होती. 

विकास यांनी 2003मध्ये सैन्यात भरती झाल्यानंतर पंजाब, जम्मू-काश्‍मीर, अरुणाचल प्रदेश, आसाम, तसेच शांतीसैनिक म्हणून इथिओपिया व सुदान येथे कर्तव्य बजावले. अत्यंत दुर्गम प्रदेशात देशसेवा केली. विकास यांची शौर्यगाथा डोंगरगणच नव्हे, तर नगरकरांसाठी कौतुकाची, अभिमानाची बाब ठरली आहे. या कामगिरीबद्दल त्यांचा डोंगरगण, पिंपळगाव माळवी, जेऊर, आढाववाडी, मांजरसुंबेसह परिसरातील गावांत नागरी सत्कार करण्यात येत आहेत. 

 

विकासची बालपणापासून सैन्यात जाण्याची इच्छा होती. आम्हीही त्याच्या इच्छेविरुद्ध न जाता, सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याला मिळालेल्या शौर्यपदकामुळे पवार कुटुंबीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. त्यातून आदर्श घेऊन इतर तरुणांनीही देशसेवा करावी. 
- वसंत पवार, निवृत्त सैनिक व विकास यांचे वडील, डोंगरगण 

सैन्यात नोकरी करताना काळजी घ्यावी लागते. अनेक सूचनांचे पालन करावे लागते. प्रत्येकालाच विशेष कामाची संधी मिळत नाही. विकासला मिळालेल्या संधीचे त्याने सोने केले. शौर्यपदक मिळाल्याचा विशेष आनंद झाला. 
- सदाशिव पवार, निवृत्त सैनिक व विकास यांचे बंधू, डोंगरगण 

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three terrorists killed in Jammu and Kashmir