
बेकायदेशीर रित्या मुरुम, वाळू आणि डांबर यांचा अवैध उपसा करणा-यांविरुध्द धडक कारवाई करण्यात येत असल्याने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
शेवगाव (अहमदनगर) : गौणखजिनाचा अवैध उपसा करुन वाहतूक केल्याप्रकरणी महसूल विभागाच्या पथकाने तालुक्यातील दिंडेवाडी येथील एक जेसीबी, दोन ट्रॅक्टर पकडून त्यांना सुमारे ९ लाख ७० हजार रुपयांचा दंड करण्यात आला. ही कारवाई गुरुवार (ता.५) रोजी मंडलाधिकारी रमेश सावंत यांच्या पथकाने केली. याबाबत पंचनामा करुन वाहन मालकांना नोटीसा काढण्यात आल्या आहेत. बेकायदेशीर रित्या मुरुम, वाळू आणि डांबर यांचा अवैध उपसा करणा-यांविरुध्द धडक कारवाई करण्यात येत असल्याने अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
पोलिस पाटलांविनाच चाललाय ७०० गावांचा कारभार
तहसिलदार अर्चना भाकड-पागिरे, नायब तहसिलदार मयूर बेरड यांनी तालुक्यातील गौण खनिजाचा बेसुमार उपसा करणा-यांविरुध्द धडक मोहिम सुरु केली आहे. त्यानूसार दिंडेवाडी (ता. शेवगाव) शिवारात जेसीबी क्रमांक एम.एच १६ ए.व्ही ५१६८ च्या सहाय्याने विहीरीवरील अवैध मुरुमाचे उत्खनन करुन ते ट्रॅक्टर क्रमांक एम एच १६ ए.एम ९२६७ व एक विनानंबरचा ट्रॅक्टरमध्ये भरुन वाहतूक करताना आढळून आले. त्यामुळे जेसीबीसाठी ७ लाख ५० हजार तर दोन ट्रॅक्टरसाठी प्रत्येकी १ लाख १० हजार असा सुमारे ९ लाख ७० रुपये दंड करण्यात आला.
ऑइल, डिझेलचोर पकडले; टोळीचा पर्दाफाश
यासंदर्भात जेसीबी मालक शिवाजी गोरक्ष दिंडे, ट्रॅक्टर मालक ठकाजी नेहाबा दिंडे व हनुमंत आप्पासाहेब दिंडे राहणार दिंडेवाडी (ता. शेवगाव) यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ही कारवाई तहसिलदार भाकड यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी रमेश सावंत, तलाठी चंद्रकांत गडकर, अमोल कचरे, प्रदीप मगर, अमर शेंडे, किशोर पवार आदींच्या पथकाने केली.
तालुक्यातील जमीन महसुलातून एक कोटी ४० लाख २७ हजार तर गौण खनिजातून दोन कोटी ६८ लाख ४६ हजार असा सुमारे चार कोटी ९ लाख १३ हजार रुपये महसूल वसूल करुन शासनाच्या तिजोरीत जमा केला आहे. गौण खनिजाचा अवैध उपसा करणा-यांवर जरब बसवण्यासाठी व शासनाच्या तिजोरीत भर टाकण्यासाठी ट्रक्टर, जेसीबी, डंपर मालकांवर कारवाई करण्यात येत आहे.
- अर्चना भाकड-पागिरे, तहसिलदार, शेवगाव