शेवगावात रखडलेल्या बाहयवळण रस्त्यामुळे निष्पाप नागरीकांचा बळी

सचिन सातपुते
Sunday, 27 December 2020

शेवगाव शहरातील वाहतुक कोंडीवर इलाज ठरणाऱ्या बाहयवळण रस्त्याचे अनेक वर्षापासून रखडलेले काम प्रवाशांच्या व निष्पाप नागरीकांच्या जीवावर उठले आहे.

शेवगाव (अहमदनगर) : अवजड वाहतुक, अरुंद रस्ते यामुळे डोकेदुखी ठरलेल्या शेवगाव शहरातील वाहतुक कोंडीवर इलाज ठरणाऱ्या बाहयवळण रस्त्याचे अनेक वर्षापासून रखडलेले काम प्रवाशांच्या व निष्पाप नागरीकांच्या जीवावर उठले आहे.

भुसंपादन व रस्त्याच्या कामासाठी असलेली मोठया निधीची अडचण व सरकारी पातळीवर पाठपुरावा करण्यात आलेल्या राजकीय अपयशामुळे आतापर्यंत अनेक जणांचा हकनाक बळी गेला आहे.

शहरातून नगर, नेवासे, पाथर्डी, पांढरीपूल, गेवराई, पैठण, कोरडगाव प्रमुख रस्त्यासह राज्यमार्ग जातात. मराठवाडयाचे प्रवेशव्दार असल्याने औरंगाबाद, जालना, बीड या शहरासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, मुंबई, सातारा या जिल्हयांना जोडणारी विविध प्रकारची वाहतुक सतत यामार्गावरुन सुरु असते. ज्ञानेश्वर, वृध्देश्वर, केदारेश्वर, गंगामाई या कारखान्यांचा हंगाम सुरु असतांना याच मार्गावरुन ऊस वाहतुक होते. अवजड वाहतुक शहरातील अरुंद व अतिक्रमणांनी व्यापलेल्या रस्त्यावरुन जातांना दिवसभर वारंवार वाहतुक कोंडी होते. त्यात मोठया वाहनांमुळे दुचाकी व लहान वाहनधारकांना रस्ता मिळत नाही. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
क्रांती चौक, आंबेडकर चौक, गाडेगाबाबा चौक, मिरी रस्त्यावरील शैक्षणिक संस्था व नित्यसेवा परीसरात कायम वाहतुक कोंडी होते. अवजड वाहतुक शहरातून सुरु असल्याने घडलेल्या अनेक अपघातात आतापर्यंत २० पेक्षा अधिक निष्पाप नागरीकांचा बळी गेला आहे.

या जीवघेण्या वाहतुकीस पर्याय ठरणाऱ्या बाहयवळण रस्त्याचे काम तीन टप्यात सुरु करण्यासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या कार्यकाळात मंजूरी मिळाली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सी. डी. फकीर कार्यकारी अभियंता असतांना त्यांनी नऊ कोटींचा प्रस्तावही मंजूर केला होता. त्यानुसार भुसंपादन करण्यासाठी बांधकाम विभागाने भुमिअभिलेख कार्यालयाकडे संयुक्त मोजणी प्रस्तावही सादर केला होता. मात्र प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठी जमिनी जाणा-या शेतक-यांनी हरकती घेतल्याने हे काम रखडले.

मंजूरीनंतर पाच वर्ष काम सुरु न झाल्याने कामाची मान्यता रद्द झाली. त्यानंतर नवीन भुसंपादन कायदा लागू झाल्याने जमिनीच्या रेडीरेकनरचे दर वाढले त्यामुळे त्याप्रमाणात शेतक-यांना दयावयाच्या रक्कमेतही वाढ झाली. अलीकडच्या काळात आमदार मोनिका राजळे व खासदार सुजय विखे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास पुन्हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार त्यांनी भुसंपादनच्या कामासाठी ५० कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केला. मात्र कोरोनाच्या कालावधीत शासनाच्या अंदाजपत्रकीय मंजूरीसाठी हा प्रस्ताव न आल्याने पुढील प्रक्रिया रखडली. दिवसेंदिवस भुसंपादन व रस्त्याच्या कामासाठी लागणा-या निधीचा आकडा वाढत चालला असतांना सरकार व लोकप्रतिनिधी यांच्यातील राजकीय इच्छा शक्ती अभावी हा रस्ता शेवगावकरांसाठी मात्र दिवास्वप्न ठरला आहे. दररोज शहरात घडणा-या अपघातामुळे जिवघेण्या वाहतुकीचा प्रश्न आणखी किती जणांचा बळी घेणार असा सवाल नागरीकांना पडला आहे. 

असा होवू शकतो बाहयवळण रस्ता 
नगर पाथर्डी रस्त्यावरील भगुर येथील पुलापासून कोरडे वस्ती, राजेंद्र फलोदयान, सालवडगाव पाण्याची टाकी, माळेगाव ने महादेवस्थान चौफुला, गेवराई रस्त्यावरील पाण्याची टाकी, बाभुळगाव रस्ता- कवठीचा नाला- क्रिडा संकुल शेजारी पैठण रोड- माळीवाडा- जिनींग ते नेवासा रस्ता- लांडे वस्ती- मिरी रस्ता न्यू आर्टस क्रिडा संकुल ते भगूर पुलाजवळ. 

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic jam in Shevgaon due to bypass road