नगर- मनमाड महामार्ग केंद्राकडे हस्तांतरित करा : माजी खासदार तनपुरे

सकाळ वृत्तसेवा
Monday, 5 October 2020

अहमदनगर- मनमाड महामार्ग केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली. तसेच, या विषयावरील निवेदन केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनाही दिले.

नगर : अहमदनगर- मनमाड महामार्ग केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्यात यावा, अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली. तसेच, या विषयावरील निवेदन केंद्रीय रस्ते व परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनाही दिले. 

निवेदनात म्हटले आहे, की 3 जानेवारी 2017च्या केंद्र सरकारच्या राजपत्रात सिन्नर, सावळीविहीर फाटा, शिर्डी, राहुरी, नगर, दौंड, फलटण, मिरज ते चिक्कोडी (कर्नाटक राज्य) असा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आलेला आहे. नगर ते कोपरगाव या रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम राज्य सरकारने सन 2000च्या सुमारास केलेले आहे. त्या वेळी प्रत्येक वाहनाचे सरासरी 20 टन वजन गृहीत धरलेले आहे; मात्र गेल्या 20 वर्षांत वाहनांच्या वाहतूक क्षमतेमध्ये प्रचंड सुधारणा होऊन अवजड वाहने रस्त्यावर धावू लागली.

त्यातच शिर्डी व शिंगणापूर ही दोन्ही जागतिक दर्जाची तीर्थस्थळे या रस्त्यावरच असल्याने, धार्मिक उत्सवांच्या दिवशी यामध्ये दुप्पट वाढ होते. 20 वर्षांपूर्वी रस्ता तयार करताना याचा विचार झालेला नाही. त्यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडतात. त्यातच वाढत्या औद्योगीकरणामुळे वाहतूकही प्रचंड प्रमाणात वाढली आहे. यंदाच्या चांगल्या पावसामुळे संपूर्ण रस्ताच उखडलेला आहे. यामुळे अपघातांमध्ये वाढ झालेली आहे. वाहतूकही अत्यंत संथ गतीने होत आहे. 

रस्ता चौपदरीकरणासाठी नव्याने भूसंपादनाची आवश्‍यकता नाही. या रस्त्याच्या सहापदरी कॉंक्रिटीकरणास 1200 कोटी, तर चौपदरी कॉंक्रिटीकरणासाठी 800 कोटी व डांबरीकरणासाठी 500 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. एवढा मोठा खर्च करणे राज्य शासनास सध्याच्या परिस्थितीमध्ये अवघड आहे. नगर-मनमाड रस्ता उत्तर व दक्षिण भारताला जोडणारा रस्ता आहे. हा रस्ता राज्य सरकारकडून केंद्र सरकारच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित होण्यासाठी प्रयत्न करावेत. 

सिमेंट कॉंक्रिटीकरण आवश्‍यक 
शिर्डी व शिंगणापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, शिर्डी विमानतळ, सात रेल्वे स्टेशन, 11 साखर कारखाने, अनेक सहकारी संस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्या यांची वाहतूकही याच रस्त्यावरून होते. या सर्व वाहतुकीचा ताण सहन करण्यासाठी हा रस्ता सिमेंट कॉक्रिटचा होणे गरजेचे आहे.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Transfer to Nagar Manmad Highway Central government