गडाख म्हणाले, राठोडांच्याच सहकार्याने मंत्रिपद मिळालं, सर्वपक्षीय नेत्यांकडून श्रद्धांजली

अमित आवारी
Sunday, 27 September 2020

फडणवीस म्हणाले, ""ज्येष्ठ नेते व आमचे परममित्र अनिल राठोड यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून जाणारी होती. ज्या विधानसभेत ते पुन्हा भेटतील असे वाटले, मात्र त्यांना श्रद्धांजलीपर भाषण करण्याची वेळ आली.

नगर ः शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्या जाण्याने नगर शहराची हानी झाली आहे. ती भरून निघणे अशक्‍य आहे. त्यांनी केलेल्या अजोड कामाचा आदर्श घेऊन काम केल्यास त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. राजकारण हे डोक्‍याने खेळायचे असते. मात्र, त्यांनी डोक्‍याने नव्हे तर भावनेने राजकारण केले, असे प्रतिपादन मृदू व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी केले.

शहरातील नक्षत्र लॉन येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गडाख बोलत होते.

या प्रसंगी शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर, माजी आमदार विजय औटी, दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अभय आगरकर, वसंत लोढा, भाजपचे शहराध्यक्ष महेंद्र गंधे, माजी महापौर अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, सुरेखा कदम, कॉंग्रेसचे शहरप्रमुख किरण काळे, दीप चव्हाण आदी उपस्थित होते.

या प्रसंगी सकाळचे कार्यकारी संपादक ऍड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली. 
मंत्री गडाख म्हणाले, छोट्या माणसांसाठी मोठ्या अधिकाऱ्यांना अंगावर घेण्याची धमक अनिल राठोड यांच्यात होती. त्यांनी फाटक्‍या-तुटक्‍यांसाठी काम केले म्हणून ते 25 वर्षे आमदार होते.

राठोड यांनी स्वतःच्या कुटूंबाकडे दुर्लक्ष करून गरिबांचे कुटूंब चालविण्याचे काम केले. त्यांचे सहकार्य दुर्दैवाने मिळाले नाही. मला राज्याचे मंत्रीपद मिळण्यात राठोड यांचे सहकार्य आहे, असे गडाख यांनी आवर्जून सांगितले.

विजय औटी म्हणाले, ""राठोड यांच्याबरोबर सलग 10 वर्षे मी काम केले. ते माझे जीवलग मित्र होते. नगर शहर व शिवसेना यांचे वेगळे नाते आहे. नगर शहर व शिवसेना म्हणजे अनिल राठोड. असं ते मला विनोदाने म्हणायचे, "विधानमंडळाला जास्त वेळ देणारा जास्त वेळा निवडून येत नाही.' भैय्या सर्वसामान्यांचे नेते होते. सर्वसामान्यांना पक्ष नसतो. म्हणून सर्व पक्षीय श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

भविष्यात काय दडले आहे हे माहिती नसते पण इतिहासाकडून काही शिकता येते. शिवसैनिकांना भैय्यांकडून बरेच शिकता येईल.'' 

भाऊ कोरगावकर म्हणाले, ""1995पासून अनिल राठोड यांचे मला सहकार्य लाभले. त्यांना विश्‍वास होता की सर्व शिवसैनिक माझ्या कुटूंबाबरोबर असतील. भैय्यांचा चरित्र ग्रंथ व्हावा. यासाठी शिवसैनिकांनी प्रयत्न करावे,'' अशी अपेक्षा कोरगावकर यांनी व्यक्‍त केली. 

देवेंद्र फडणवीसांनी वाहिली आदरांजली 
श्रद्धांजली सभेत राज्यातील अनेक नेत्यांनी दृकश्राव्य माध्यमातून आदरांजली संदेश पाठविला. यात विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, शिवसेनेचे सचिव अनिल देसाई, उपनेत्या नीलम गोऱ्हे, बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव, माजी मंत्री गिरीश बापट, एकनाथ खडसे, आदर्शऋषी आदींचा समावेश होता.

फडणवीस म्हणाले, ""ज्येष्ठ नेते व आमचे परममित्र अनिल राठोड यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून जाणारी होती. ज्या विधानसभेत ते पुन्हा भेटतील असे वाटले, मात्र त्यांना श्रद्धांजलीपर भाषण करण्याची वेळ आली. ते सामान्य माणसांशी जोडलेले व सामान्य माणसांना मदत करणारे होते. कट्टर हिंदू असले तरी त्यांनी इतर धर्मियांवर अन्याय केला नाही. त्यांच्या निधनाने माझी वैयक्‍तिक झाली आहे. मनाचा मोठेपणा व दिलदारपणा त्यांच्यात होता.'' 

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tribute to Anil Rathore from all party leaders