संगमनेरात गावठी कट्ट्यासह दोघांना अटक

आनंद गायकवाड
Thursday, 22 October 2020

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जून्या पुणे नाशिक महामार्गाने झोळे टोलनाक्याच्या दिशेने एक विना क्रमांकाची दुचाकी व त्यावरील दोघेजण येत असल्याचे पथकाला दिसले.

संगमनेर ः संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अभय परमार यांना दुचाकीवरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या युवकांकडे विनापरवाना गावठी कट्टा असल्याची माहिती समजली होती.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार ( ता. 21 ) च्या रात्री सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या पथकातील पोलिस काँस्टेबल नीलेश धादवड, महादेव हांडे व साईनाथ तळेकर यांनी तालुक्यातील रायतेवाडी शिवारात केलेल्या कारवाईत गावठी कट्टा व दोन जीवंत काडतुसांसह सुमारे 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास जून्या पुणे नाशिक महामार्गाने झोळे टोलनाक्याच्या दिशेने एक विना क्रमांकाची दुचाकी व त्यावरील दोघेजण येत असल्याचे पथकाला दिसले.

त्यांना थांबवून अंगझडती घेतली असता दुचाकी चालकाच्या कंबरेला गावठी पिस्तुल व त्यात दोन जीवंत काडतुसे आढळली. त्यांची नावे पृथ्वीराज उर्फ देवा आबासाहेब देशमुख ( 30) व किरण विजय दळवी ( 24 ) दोघेही रा. शिरसगाव, ता. नेवासे असे असल्याचे सांगीतले.

पोलिसांनी त्यांच्याकडून 25 हजार रुपये किंमतीचे गावठी पिस्तुल, दोन हजार रुपये किंमतीची दोन जीवंत काडतूसे, 50 हजार रुपये किंमतीची विना क्रमांकाची दुचाकी व प्रत्येकी दहा हजार रुपये किंमतीचे दोन मोर्बाइल असा एकूण 97 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस काँस्टेबल अशोक गाडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी त्यांच्यावर भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 सह मुंबई पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1)(3) चे उल्लंघन व 135 प्रमाणे कारवाई करुन, त्यांना पहाटे दीडच्या सुमारास अटक केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two arrested in Sangamnera