नेवाशात दोन मुलींचे अपहरण, एक सापडली दुसरी बेपत्ताच

सुनील गर्जे
Tuesday, 5 January 2021

कापडाने मुलीचे तोंड दाबून तिला दुचाकीवर बसवून मक्तापूर शिवारातील पाटाकडे नेले. तेथे तिच्यावर बळजबरी करू लागले.

नेवासे : तालुक्‍यातील एका गावात रात्रीच्या वेळी घराबाहेर आलेल्या मुलीचे तोंड कापडाने दाबून, तिला जबरदस्तीने दुचाकीवर पळवून नेल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी दोघांविरुद्ध अपहरण व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. त्यातील एकास पोलिसांनी अटक केली.

रितेश पूनमचंद साळवे (वय 22, रा. मक्तापूर, ता. नेवासे) असे त्याचे नाव आहे. त्याचा मित्र घटनेनंतर पसार झाला. या बाबत पीडित मुलीने पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार, रविवारी (ता. 3) रात्री साडेआठच्या सुमारास मुलगी घराबाहेर आलेली असताना, संशयित आरोपी रितेश साळवे व त्याचा मित्र तेथे आले.

हेही वाचा - नियती क्रूर किती आहे बघा

कापडाने मुलीचे तोंड दाबून तिला दुचाकीवर बसवून मक्तापूर शिवारातील पाटाकडे नेले. तेथे तिच्यावर बळजबरी करू लागले. तिचे फोटो काढून, हा प्रकार कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. याबाबत नेवासे पोलिसांनी साळवे यास अटक केली असून, त्याच्या जोडीदाराचा शोध सुरू आहे. 

अल्पवयीन मुलीला पळविले 
नेवासे तालुक्‍यातील आणखी एका गावात, पहाटे घराबाहेर गेलेली 17 वर्षीय मुलगी बेपत्ता झाली. घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र ती सापडली नाही. याबाबत मुलीच्या वडिलांनी नेवासे पोलिसांत फिर्याद दिली आहे. फूस लावून कोणीतरी मुलीला पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

अहमदनगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two girls abducted in Newash, one found missing