श्रीरामपूर भाजपमध्ये बंडाळी, सव्वादोनशे बूथप्रमुखांनी दिले राजीनामे

गौरव साळुंके
Saturday, 31 October 2020

पक्षाच्या घटनेने बुथ प्रमुखांच्या मताला सर्वोच्च महत्व दिले असताना त्यांना बाजूला ठेवुन केलेल्या नियुक्त्यांचा निषेध करण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मतदारसंघातील २१३ बुथ प्रमुखांसह ४४ शक्ती केंद्र प्रमुखांनी पदाचे राजीनामे पाठविले आहे.

श्रीरामपूर ः उत्तर जिल्हा भाजपाच्या कार्यकारणीने केलेल्या नुतन पदाधिकारी निवडीचा निषेध करत मतदारसंघातील २१३ बुथ प्रमुखांसह ४४ शक्ती केंद्र प्रमुखांनी राजीनामे दिल्याने श्रीरामपूरात भाजपामध्ये मोठी दुफळी निर्माण झाली आहे.

सर्व बुथप्रमुखांसह स्थानिक कार्यकर्त्यांना बाजुला ठेवुन महिनाभरापुर्वी जिल्हा भाजपा कार्यकारणीने तालुकाध्यक्ष आणि शहराध्यक्ष पदाच्या निवडी केल्या. त्यामुळे सुमारे तालुक्यातील सहा हजार कार्यकर्त्यांच्या पुढाकारातुन भाजपा श्रीरामपूर संचलन समितीची स्थापना करुन पक्षाचे काम करण्याचा निर्णय आज सायंकाळी येथे झाला.

या वेळी भाजपाच्या श्रीरामपूर संचलन समितीच्या तालुकाध्यक्षपदी प्रमोद भारत तर शहराध्यक्षपदी संजय यादव यांच्या निवडी करण्यात आल्या. यावेळी भाजपाचे पदाधिकारी अभिजित कुलकर्णी, नगरसेवक किरण लुणिया, राजेंद्र पाटणी, सुरेश आसणे, राजेंद्र चव्हाण, सोमनाथ पतंगे, संदिप वाकचौरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 

भाजपाने बुथ प्रमुखांना मंडलाध्यक्ष निवडीचा अधिकार दिला आहे. अशा अधिकाराला हरताळ फासून प्रत्यक्ष काम करणाऱ्या संघटनाला बाजूला ठेवुन वरिष्ठांची दिशाभूल करुन संघटन मोडित काढण्याचा प्रयत्न जिल्हा भाजपाने केला आहे. येथील मंडलाध्यक्षांनी शहराध्यक्ष पदासाठी कुलकर्णी यांचे तर तालुकाध्यक्ष पदासाठी मदन चौधरी यांची नावे बुथ प्रमुखांनी पत्राद्वारे सुचविले होते. परंतु जाणीवपुर्वक त्याकडे दुर्लक्ष करुन बुथ प्रमुखांची मते डावलून काही पुस्कट लोकांना मान ठेवुन नुतन पदाधिकारी नियुक्त्या केल्याचा आरोप करण्यात आला.

पक्षाच्या घटनेने बुथ प्रमुखांच्या मताला सर्वोच्च महत्व दिले असताना त्यांना बाजूला ठेवुन केलेल्या नियुक्त्यांचा निषेध करण्यात आला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मतदारसंघातील २१३ बुथ प्रमुखांसह ४४ शक्ती केंद्र प्रमुखांनी पदाचे राजीनामे पाठविले आहे. 

भाजपामध्ये जन्म झाल्याने आपला रक्तगट भाजपाच आहेत. म्हणून पक्षाच्या विचारधारेपासून तसेच तत्वांपासून वेगळे न होता. भाजपाच कायम राहुन भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांचे नेतृत्व डावलुन भाजपा श्रीरामपूर संचलन समितीच्या नावाखाली काम करणार असल्याचा निर्णय अभिजित कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सर्वानुमते घोषित केला.

गेल्या ३० वर्षापासुन अविरतपणे भाजपाचे काम करुन कार्यकर्त्यांनी पक्षाचा विस्तार केला. परंतू जिल्हा भाजपाने संघटना मोडित काढण्याचा प्रयत्न केला. असुन केवळ व्यक्ती द्वेशातुन नुतन पदाधिकारी निवडी केल्याचा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two political groups in Shrirampur BJP