मुळा एज्युकेशन म्हणजे बेस्टच, डॉ. शंकर लावरेंना विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य बहुमान

सुनील गर्जे
Thursday, 28 January 2021

प्राचार्य लावरे यांचा नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर असतो. त्यांचे 4 पेटंट, 100 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, 15 क्रमिक पुस्तके व 4 आंतरराष्ट्रीय संदर्भग्र॑थ प्रकशित झाले आहेत.

नेवासे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठार्फे वर्धापनदिनानिमित्ताने दिल्या जाणाऱ्या विविध नामवंत पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. त्यात मुळा एज्युकेशन सोसायटीचे सोनई येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांना सन 2021 यावर्षीचा  'उत्कृष्ट प्राचार्य' हा शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वाचा व मानाचा समजला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.

डॉ. लावरे यांना पुरस्कार जाहीर होताच मुळा एज्युकेशन सोसायटी व सोनई महाविद्यालयात एकाच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

हेही वाचा - पोपटरावांनी सत्ता आणली पण सरपंचपद गेलं

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून 
प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांना विद्यार्थी व शिक्षक यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या योगदानाबहल हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता, व्यावसायिकता, संशोधन नवकल्पना आणि महाविद्यालय व्यवस्थापन इत्यादी सेवांची गुणवत्ता आणि योगदान या निकषांच्या आधारे हा पुरस्कार देण्यात आला.

चार पेटंट, शंभर शोधनिबंध

प्राचार्य लावरे यांचा नेहमी नाविन्यपूर्ण उपक्रमांवर भर असतो. त्यांचे 4 पेटंट, 100 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शोधनिबंध, 15 क्रमिक पुस्तके व 4 आंतरराष्ट्रीय संदर्भग्र॑थ प्रकशित झाले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे विद्यापीठात बारा विद्यार्थ्यांनी पीएचडी संशोधन पूर्ण केले.

ग्रामीण भागातील  विद्यार्थी-विद्यार्थिनींना उत्कृष्ट व दर्जेदार शिक्षण मिळावे  या उदात्त हेतूने  मुळा एज्युकेशन सोसायटी नेहमी प्रयत्नशील असते. डॉ लावरे यांना मिळालेल्या पुरस्काराने मुळा एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करणाऱ्या सर्वच सेवकांचा एकप्रकारे सन्मान झाला आहे. तो सर्वांना प्रेरणादायी आहे.

 

"मुळा एज्युकेशन सोसायटीचे  शिक्षकवृंद माजी  खासदार यशवंतराव गडाख  यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काम करत असतात. संस्थेसाठी काम करणाऱ्या  प्राचार्य डॉ. शंकर लावरे यांना  मिळालेला प्रतिष्ठेचा उत्कृष्ट प्राचार्य' पुरस्कार व त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील  कामगिरीचा माझ्यासह संपूर्ण मुळा एज्युकेशन परिवाराला अभिमान आहे.
- प्रशांत पाटील गडाख, अध्यक्ष, मुळा एज्युकेशन सोसायटी, नेवासा

संपादन - अशोक निंबाळकर
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: University Outstanding Principal Award to Mula Education Lavare