नगर महापालिकेत उभी फूट 

amc
amc

नगर : "कोरोना संकटाच्या काळात महापालिकेकडून कर्मचाऱ्यांची हेळसांड सुरू आहे. यावर नगर महापालिका कर्मचारी संघटनेतील वरिष्ठ पदाधिकारी बोटचेपेपणाची भूमिका घेत आहेत,' असा आरोप करीत संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांनी सवता सुभा मांडला आहे. या नवीन संघटनेचे, "महापालिका अधिकारी, कर्मचारी समन्वय समिती' असे नामकरण करण्यात आले आहे. या संघटनेने महापालिका कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबतचे निवेदन आज महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार यांना दिले. नगर महापालिका कामगार संघटनेतील जंबो कार्यकारिणीत असलेले पदाधिकारी येत्या दोन दिवसांत राजीनामे देणार असल्याचे समजते.  

त्यात म्हटले आहे, की नगरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी आपले दैनंदिन कर्तव्य निःस्वार्थपणे बजावीत आहेत. 30 ते 50 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी महापालिकेकडून दखल घेतली जात नाही. महापालिकेच्या कोरोनाबाधित महिला कर्मचाऱ्याला उपचारासाठी नगर शहरात सर्वत्र फिरावे लागले. याचा विचार करता, महापालिका प्रशासन व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचे सकारात्मक धोरण नसल्याने, तसेच महापालिका कामगार संघटनादेखील ठोस निर्णय व जबाबदारी घेत नसल्याने सर्व कर्मचारी प्रचंड दहशतीखाली आहेत. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कामावर होत आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संयुक्तरीत्या निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी महापालिका कर्मचारी समन्वय समिती स्थानिक पातळीवर स्थापन केली आहे. 

निवेदनावर विजय बालाणी, विजय बोधे, दिनेश सूळ, गणेश लयचेट्टी, बाळासाहेब विधाते, अविनाश हंस, नंदकुमार नेमाणे व राहुल साबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. यातील काही जण महापालिका कामगार संघटनेत पदाधिकारी आहेत. 

संघटनेच्या मागण्या 
- शासन नियमानुसार महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांना, कोरोनाचा संसर्ग झाल्यास व त्यात कर्मचारी मृत झाल्यास वारसास 50 लाख रुपये तातडीने द्यावेत. 
- केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेत देण्यात येणाऱ्या विमा कवचाचा लाभ द्यावा. 
- महापालिका अधिकारी, कर्मचारी, तसेच त्यांचे कुटुंब कोरोनाबाधित आढळल्यास त्यांना आवश्‍यकतेनुसार शासकीय किंवा खासगी कोरोना सेंटरमध्ये तातडीने वैद्यकीय सेवा मिळावी. 
- खासगी दवाखान्यात उपचारासाठी पूर्वलक्ष्यी प्रभावाने अग्रीम रक्कम तातडीने, विनाशुल्क उपलब्ध करून देण्यात यावी. 
- कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याच्या वारसास अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नोकरीत समाविष्ट करावे. याबाबत सेवाज्येष्ठतेचा निकष धरण्यात येऊ नये. 


ही सगळी आपल्याच माणसे आहेत. लोकशाही आहे. प्रत्येकाला विचार मांडण्याचा अधिकार आहे. कामगारांच्या हितासाठी शेवटचा कामगार बरोबर असेपर्यंत मी झेंडा हातात घेऊन उभा राहील. 
- अनंत लोखंडे, अध्यक्ष, अहमदनगर महापालिका कामगार संघटना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com