छात्रभारतीकडून शालेय शिक्षणमंत्र्यांना पाठविला काळा कंदील 

आनंद गायकवाड
Sunday, 15 November 2020

विनाअनुदानित शाळेवरील शिक्षकांचा प्रश्न सुमारे 20 वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यातून विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही फसवणूक होत आहे.

संगमनेर (अहमदनगर) : विनाअनुदानित शाळेवरील शिक्षकांचा प्रश्न सुमारे 20 वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यातून विद्यार्थ्यांसह शिक्षकांचीही फसवणूक होत आहे. सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ दिवाळीनिमित्त छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना काळा आकाश कंदील भेट म्हणून पोस्टाने पाठवून दिला. 

नगर जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
निवेदनात म्हटले आहे, की विनाअनुदानित धोरणामुळे आजवर अनेक शिक्षकांनी आत्महत्या केल्या. मात्र, पाषाणहृदयी सरकारला शिक्षकांच्या समस्यांचे काही देणे-घेणे नाही. सरकारला अजूनही पाझर फुटलेला नाही. खोटी आश्वासने देऊन आंदोलक शिक्षकांची बोळवण केली जाते. मोफत शिक्षण देणे ही सरकारची जबाबदारी आहे.

मात्र, राज्यातील कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्यात येत आहेत. त्याचा परिणाम ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर होत आहे. निवेदनावर अनिकेत घुले, तुषार पानसरे, प्रवीण गुंजाळ, राधेश्‍याम थिटमे, तृप्ती जोर्वेकर, संदीप आखाडे, ऋषिकेश वाकचौरे, सोमनाथ फापाळे, दीपाली कदारे, हर्षल कोकणे, आशिष घुले, शुभम गोर्डे आदींच्या सह्या आहेत.

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidyarthi Bharati School Education Minister black lamp