बारामतीचे मतदार आले वळणला, सायकलवर येत बजावले कर्तव्य

विलास कुलकर्णी
Friday, 15 January 2021

मतदान अधिकाराच्या कर्तव्याची जाणीव व सायकलींग व्यायाम असा दुहेरी संदेश देऊन, तरुणाने जनजागृती केली. ग्रामस्थांनी सत्कार, स्वागत करून, तरुणाचे कौतुक केले.

राहुरी (अहमदनगर) : तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज सकाळपासून उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेल्या एका मतदाराने चक्क सायकलवरुन रपेट मारली. बारामती ते वळण १८० किलोमीटरचा सायकल प्रवास करून, ९ तास ३३ मिनिटात गाव गाठले. मतदान अधिकाराच्या कर्तव्याची जाणीव व सायकलींग व्यायाम असा दुहेरी संदेश देऊन, तरुणाने जनजागृती केली. ग्रामस्थांनी सत्कार, स्वागत करून, तरुणाचे कौतुक केले.

अहमदनगरच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

विजय भाऊसाहेब बनकर (वय ३८, रा. वळण) असे या तरुणाचे नाव आहे. ते बारामती येथे एका कंपनीत नोकरीमुळे स्थायिक झाले. परंतु, मूळगावी वळण येथे त्यांच्या आई व भावाचे कुटुंब राहते. मतदानाच्या कर्तव्याबरोबर आईचे तिळगुळ घेण्याचा योग जुळून आल्याने, बनकर यांनी मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता बारामती सोडली. सायंकाळी सात वाजता १८० किमीचा सायकल प्रवास करून, वळण येथे घर गाठले. त्यांचे कुटुंबाप्रती असलेले प्रेम, मतदानाच्या अधिकाराची जाणीव व सायकलींगची आवड ग्रामस्थांना भावली. गावात पोहोचल्यावर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार करून स्वागत केले.

हे ही वाचा : अण्णांनी केले मतदान, उमेदवार पसंत नसेल तर नोटा दाबा

तालुक्यात ४४ ग्रामपंचायतींच्या १६८ पैकी ८ मतदार केंद्रांवरील उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. ४१८ पैकी ५६ सदस्यांची बिनविरोध निवड झाली. त्यामुळे, उर्वरित ३१२ सदस्यांच्या निवडीसाठी १६० मतदान केंद्रांवर सकाळी साडेसात वाजल्यापासून शांततेत मतदान सुरू झाले. पहिल्या दोन तासात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत एकूण ९० हजार ३९२ पैकी ११ हजार ३१८ (१२.५२ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात एकही ग्रामपंचायत संवेदनशील घोषित नाही. तरी, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी प्रत्येक मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vijay Bankar has cast his vote by traveling from Baramati to valan bicycle