श्रीगोंद्याच्या राजकारणात विक्रमसिंह अॅक्टीव्ह झाले...दुधाच्या मुद्यावरून गरजले

संजय आ. काटे
Monday, 20 July 2020

पाचपुते राष्ट्रवादीत मंत्री होते. त्या वेळी विक्रमसिंह यांनी नगर मतदारसंघातून लोकसभेसाठी जोरदार तयारी केली होती.

श्रीगोंदे : काही वर्षांपूर्वी खासदारकीच्या तयारीत असलेले विक्रमसिंह पाचपुते मध्यंतरी राजकारणातून गायब झाले होते. मात्र, आता ते पुन्हा एकदा "ऍक्‍टिव्ह मोड'मध्ये आले आहेत. भाजपतर्फे आज त्यांनी दूधदरवाढीसाठी निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला. तालुक्‍यात भाजपच्या माध्यमातून युवा संघटन उभारण्याच्या तयारीत ते असल्याचे दिसते.

तहसीलदार महेंद्र माळी यांनी निवेदन स्वीकारले. भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, उमेश बोरुडे, संतोष खेतमाळीस, सुनील वाळके, संतोष क्षीरसागर, राजेंद्र उकांडे, महेश क्षीरसागर उपस्थित होते.

हेही वाचा - सारा अनर्थ एका  लग्नाने केला

आमदार बबनराव पाचपुते यांची तब्येत काही दिवसांपासून ठीक नाही. त्यामुळे मतदारसंघाची सूत्रे विक्रमसिंह यांनी हाती घेतल्याचे दिसते. पाचपुते राष्ट्रवादीत मंत्री होते. त्या वेळी विक्रमसिंह यांनी नगर मतदारसंघातून लोकसभेसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र, त्या वेळी राष्ट्रवादीने दिवंगत नेते राजीव राजळे यांना उमेदवारी दिली.

त्यानंतर काही काळ विक्रमसिंह राजकारणात सक्रिय राहिले. मात्र, गेल्या विधानसभेला बबनराव पाचपुते यांचा पराभव झाला आणि विक्रमसिंह अज्ञातवासात गेले.

मागील निवडणुकीत वडिलांच्या विजयात विक्रमसिंह यांनी सिंहाचा वाटा उचलला. त्यानंतर आता ते पुन्हा तालुक्‍यात दिसत आहेत. गायीच्या दुधाला लिटरमागे 10 रुपये अनुदान, दूध भुकटीसाठी प्रतिकिलो 50 रुपये अनुदान, शासनाने 30 रुपये लिटरने दूधखरेदी करावी, यासाठी आंदोलनाच्या तयारीत असल्याचे ते म्हणाले. 

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikram Singh is active in the politics of Shrigonda