लग्न समारंभ बनले ग्रामपंचायत प्रचाराचे केंद्र, उमेदवार झाले हायफाय वऱ्हाडी

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 7 January 2021

कोरोनामुळे जिवाच्या भीतीने आठ महिने घराबाहेर न पडलेले आज लग्नसमारंभात मोठी गर्दी करताना दिसत आहेत.
 

अकोले : डीजे, फटाके, मानपान, पुढाऱ्यांचे आशीर्वाद, नातेवाईक व मित्रपरिवाराची मोठी गर्दी, भोजन, अशी रेलचेल लग्नसमारंभांत पुन्हा दिसू लागली आहे.

विवाहाची मोठी तिथी असल्याने आज सर्वच मंगल कार्यालयांत मोठी गर्दी होती. उमेदवारांनी प्रत्येक विवाहाला आवर्जून हजेरी लावली. त्यामुळे नमस्कार घालणारे "भावी सरपंच'च लग्नाच्या वरातीत दिसले. बहुतेक लग्नसमारंभांत अचानक "हायफाय वऱ्हाडी' अवतरले. 

कोरोनामुळे जिवाच्या भीतीने आठ महिने घराबाहेर न पडलेले आज लग्नसमारंभात मोठी गर्दी करताना दिसत आहेत. पुरुष, महिला, मुले, मुली लग्नसमारंभात सहभागी होताना, काही घडलेच नाही, या आवेशाने एकमेकांच्या गळ्यात गळे घालून डीजेच्या नादावर थिरकत आहेत.

हेही वाचा - विधवा भावजयीसोबत लहान दिराने बांधली लग्नगाठ

मास्क "टाय'सारखे तोंडाला अडकवत, तोंड उघडे ठेवून गप्पांच्या मैफलीही रंगत आहेत. प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यग्र असून, पुढारी आशीर्वाद देण्यासाठी आपल्या वाहनांचे ताफे व कार्यकर्त्यांची फौज घेऊनच लग्नात चमकू लागले आहेत. 

आशीर्वाद दिल्यानंतर व लग्न लागल्यावर भोजनाचा आस्वाद घेण्यासाठीही गर्दी होताना दिसत आहे. लग्नसमारंभांत उमेदवार व त्यांचे हितचिंतक निवडणुकीचा प्रचारही करताना दिसत होते. त्यामुळे डीजेवाला, केटरर, मेक-अप आर्टिस्ट, मंगल कार्यालयांचे संचालक असे सर्वच आनंदित आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wedding ceremony became the center of Gram Panchayat propaganda