श्री रेणुका माता मंदिराचे काम प्रगतीपथावर; भक्तांनी सढळ हाताने मदत करावी असे विश्वस्त मंडळाचे आवाहन

मनोज जोशी 
Sunday, 29 November 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात-आठ महिन्यांपासून मंदिर बंद होते. आता सर्व मंदिरे खुली करण्यात आल्याने मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. त्यामुळे भाविक भक्तांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आहे. 

कोपरगाव (अहमदनगर ) : त्र्यंबकेश्वर मंदिराच्या धर्तीवर गेल्या सात-आठ वर्षांपासून तालुक्यातील उक्कडगाव येथील श्री रेणुका माता मंदिराचे काम संथ गतीने सुरू आहे. मंदिराचे काम सुमारे चार कोटी रुपये खर्चाचे आहे. देवी मातेच्या कृपेने मंदिराचे काम भाविक भक्तांच्या गावकऱ्यांच्या व विविध नेत्यांच्या खासदार आणि आमदारांच्या सहकार्याने तसेच देश-विदेशातील राज्यातील परराज्यातील देवी भक्त आत्तापर्यंत दिलेल्या मदतीतून स्टील, खडी, सिमेंट, वाळू व रोख स्वरूपात दिलेल्या रकमेतून काम प्रगतीपथावर आहे. या मंदिराची शनिवारपासून कामास सुरुवात करण्यात आली. त्याचे पूजन वैजापूर येथील शिवभक्त दत्त गिरी महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आले. 

 हे ही वाचा : शासनाकडून जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा श्रमिकराज कामगार संघटनेचा प्रयत्न

यावेळी सी.ए.दत्तात्रेय खेमनर, आर्किटेक्ट मोहित गंगवाल, अध्यक्ष अशोक शिंदे, उपाध्यक्ष निवृत्ती शिंदे, विश्वस्त देविदास शिंदे, सोपान शिंदे, लक्ष्मण शिंदे, नंदू शिंदे, रेवन निकम, विधिज्ञ दिलीप जोशी, नबाब भाई मिस्तरी यांचे सह ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते. कोरोना महामारीमुळे तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र उत्सव झाला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात-आठ महिन्यांपासून मंदिर बंद होते. आता सर्व मंदिरे खुली करण्यात आल्याने मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. त्यामुळे भाविक भक्तांची थोडीफार वर्दळ सुरू झाली आहे. 

शासन नियम पाळून भाविकांच्या दर्शनाची सोय करण्यात आली आहे. भाविकांनी सोशल डिस्टन्स पाळून दर्शन घ्यावे, असे आवाहन रेणुकादेवी देवस्थान व उक्कडगाव ग्रामस्थांनी केले आहे. मंदिराचे काम लवकरात लवकर व्हावे, यासाठी मंदिराच्या बांधकामासाठी भाविक भक्तांनी सढळ हाताने स्टील सिमेंट वाळू व इतर साहित्य देणगी म्हणून द्यावे म्हणजे हातभार लागून काम तातडीने पूर्णत्वाकडे जाईल. त्यासाठी भाविकांनी मदत करावी, असे आवाहन विश्वस्त मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे, अशी माहिती नंदू शिंदे यांनी दिली. 

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: As the work of Shri Renuka Mata Mandir is underway the board of trustees has appealed to the devotees to help generously