सहकार वर्तुळात खळबळ ः गडाखसाहेबांनी नेत्यांना झापले, मंत्री थोरात मोठे नेते पण बँकेकडे लक्ष नाही

सुनील गर्जे
Thursday, 28 January 2021

गडाख म्हणाले, "ही जिल्हा बॅंक आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रगतीपथावर ठेवण्याचा प्रयत्न स्वर्गीय मोतिभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले पाटील या दिवंगत नेत्यांसह आमच्या पिढीने केला.

नेवासे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा बॅंकेची निवडणूक सुरू झाली. जिल्हा बॅंक ही काही राजकीय पक्षांनी धुडगूस घालण्याची संस्था नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांनी फटकारले. 

आमच्या पिढीने सांभाळली

बँकेच्या आर्थिक स्थितीवरून तसेच सध्या सुरू असलेल्या राजकीय साठमारीमुळे गडाख व्यतित झाले आहेत. त्यांनी सहकारातील नेत्यांचे कान उपटताना वडिलकीचा सल्लाही दिला आहे.

हेही वाचा - हिवरे बाजारची सत्ता आणली पण पोपटरावांचं सरपंचपद गेलं

पत्रकारांशी बोलताना गडाख पाटील म्हणाले, "ही जिल्हा बॅंक आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रगतीपथावर ठेवण्याचा प्रयत्न स्वर्गीय मोतिभाऊ फिरोदिया, भाऊसाहेब थोरात, मारुतराव घुले पाटील या दिवंगत नेत्यांसह आमच्या पिढीने केला. सगळ्या ग्रामीण भागाचे अर्थकारण, साखर कारखाने, सेवा सोसायट्या जिल्हा बॅंकेवर पूर्णत: अवलंबून आहेत. 

कर्ज वसूल होतील की नाही...

गेल्या तीन वर्षांमध्ये जिल्हा बॅंकेवर बेकायदेशीर नोकर भरतीसह अनेक आरोप झाले. त्याच बरोबर जवळ जवळ शंभर कोटी रुपये राहुरी साखर कारखान्याकडे थकले आहेत. ते वसूल होतील की नाही हे माहीत नाही. अनुउत्पादीत कर्जाचे (एनपीए) प्रमाण खूप वाढलेले आहे, ही चिंताजनक बाब आहे. बॅंकेची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. अशा अवस्थेत बॅंकेकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी अपेक्षाही गडाख यांनी व्यक्त केली आहे.

मंत्री थोरात मोठे पण त्यांचंही लक्ष नाही

मंत्री बाळासाहेब थोरात हे मोठे नेते आहेत, मात्र त्यांचे जिल्हा बॅंकेकडे लक्ष नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने मातृसंस्था व कामधेनू असलेली जिल्हा बॅंक बुडाली तर जिल्ह्यातील साखर कारखाने सेवा सोसायट्या तसेच हजारो शेतकऱ्यांचे प्रपंच उघड्यावर पडतील. त्यामुळे त्यांनी यात लक्ष घालावे. तसेच पक्षीय राजकारण विरहीत बॅंक सांभाळणारे सक्षम उमेदवार द्यावेत व बॅंक सांभाळणारा सक्षम अध्यक्ष द्यावा तरच बॅंकेचे भवितव्य ठीक राहील, असा वडिलकीचा सल्लाही ज्येष्ठ नेते गडाख यांनी दिला.

संपादन - अशोक निंबाळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yashwantrao Gadakh Patil got angry with the leaders of Ahmednagar due to District Bank