शेतात फवारणीसाठी ‘तो’ विहीरीत पाणी आणण्यासाठी गेला अन्‌...

विलास कुलकर्णी
Sunday, 16 August 2020

गणेगाव येथे रविवारी (ता. 15) शेतातील विहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने विवाहित तरूण विहिरीत पडला.

राहुरी (अहमदनगर) : गणेगाव येथे रविवारी (ता. 15) शेतातील विहिरीतून पाणी काढतांना तोल गेल्याने विवाहित तरूण विहिरीत पडला. पोहता येत नसल्याने, पाण्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. राहुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सचिन नामदेव कोबरणे (वय 30, रा. ओहोळ माळ, गणेगाव) असे मृताचे नाव आहे.

रविवारी सकाळी शेतातील कपाशी पिकाला औषधाची फवारणी करण्यासाठी सचिन घरातून बाहेर पडला होता. त्यांची विहीर पाण्याने तुडुंब भरलेली आहे. फवारणीसाठी पाणी काढताना सचिनचा विहिरीत तोल गेला. तो दुपारी उशिरापर्यंत घरी आला नाही. त्यामुळे त्याला घरी बोलाविण्यासाठी वडील शेतात गेले. त्यांना विहिरीजवळ सचिनची चप्पल आढळली. 

संशय आल्याने, त्यांनी आसपासच्या लोकांना बोलाविले. काही तरुणांनी विहिरीच्या पाण्यात शोध घेतला. परंतु, विहिरीत पाणी जास्त असल्याने शोध लागला नाही. अखेर विहिरीत गळ टाकून तीन तासाच्या प्रयत्नानंतर सायंकाळी मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मृत सचिनचा दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्याची पत्नी गर्भवती आहे. मृताच्या मागे आई, वडील, पत्नी, एक भाऊ असा परिवार आहे.  

संपादन : अशोक मुरुमकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies after fetching water from a well in a field in Ganegaon