जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आरोग्य तपासणीचेही वावडे

दौलत झावरे
Sunday, 10 January 2021

सुटीच्या दिवशी तपासणी घेण्याऐवजी दैनंदिन कामकाजाच्या वेळी शिबिर आयोजित केले असते, तर सगळ्यांनीच तपासणी करून घेतली असती.

नगर ः जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी, कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे, या हेतूने तपासणी शिबिर आयोजित केले होते. त्यात फक्त 150 कर्मचाऱ्यांनी तपासणी केली. उर्वरित कर्मचाऱ्यांनी शनिवारची सुट्टी एन्जॉय केली. 

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या चांगल्या हेतूला काही कर्मचाऱ्यांनी हरताळ फासल्याचे यातून स्पष्ट झाले. कोरोना विषाणूमुळे जिल्हा परिषदेत फायलींचा निपटारा होणे बाकी होते. त्यामुळे सुटीच्या दिवशी कर्मचाऱ्यांना कामावर बोलाविले जात आहे. डिसेंबरपासून ही मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे.

हेही वाचा - विधवा भावजयीसोबत दिराने बांधली लग्नगाठ

दैनंदिन कामे करताना अनेकदा कर्मचाऱ्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असा संदेश न देता, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी त्यांच्या आरोग्य तपासणीचा निर्णय घेतला. त्यानुसार आज (शनिवारी) सकाळी दहा ते दुपारी एकदरम्यान तपासणी झाली.

यात फक्त 150 कर्मचाऱ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात 450पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाच आपल्या आरोग्याबाबत काळजी नसल्याचे स्पष्ट होत आहे. याअगोदर कोरोना काळातही काही कर्मचाऱ्यांनी रॅपिड तपासणी करून घेतली नव्हती. तीच परिस्थिती आज आरोग्य तपासणीच्या वेळी दिसून आली. 

तपासणीचा दिवस चुकला 
जिल्हा परिषदेने कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी निवडलेला दिवस चुकला असल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होती. सुटीच्या दिवशी तपासणी घेण्याऐवजी दैनंदिन कामकाजाच्या वेळी शिबिर आयोजित केले असते, तर सगळ्यांनीच तपासणी करून घेतली असती, अशी चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Zilla Parishad employees do not even do health check up