School Teachers : दप्तर... ड्रेस देतो... शाळेत पाठवा! शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात दारोदारी

डोक्यावर तळपता सूर्य, मोटारसायकलवर वाडी -वस्तीत, शेताच्या बांधावर भटकंती करत संभाव्य विद्यार्थ्यांच्या शोधात पालकांच्या दारात शिक्षकांची कसरत सुरू असल्याचे चित्र आहे.
school teacher
school teachersakal

अकोले - डोक्यावर तळपता सूर्य, मोटारसायकलवर वाडी -वस्तीत, शेताच्या बांधावर भटकंती करत संभाव्य विद्यार्थ्यांच्या शोधात पालकांच्या दारात सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत शिक्षकांची कसरत सुरू असल्याचे चित्र आहे. मुलांना शाळेत पाठवा...दप्तर देतो...ड्रेस देतो...दाखला फी ही आम्हीच भरतो...; मात्र मुले आमच्या शाळेत पाठवा... अशी विनवणी करताना माध्यमिक, उच्च माध्यमिक व जिल्हा परिषद आश्रम शाळांचे शिक्षक १५ दिवसांपासून या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.

शाळा प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाली असून, पालक आपल्या पाल्यांसाठी चांगली शाळा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, तर बहुतेक शाळांचे शिक्षक शाळेत पट संख्या वाढविण्यासाठी तळपत्या उन्हात घरोघरी भटकंती करत आहेत. ही परिस्थिती अकोले तालुक्यात सध्या पाहायला मिळत आहे; पण विद्यार्थी मिळाला नाही, तर वर्ग बंद पडले या भीतीपोटी गुरुजी विद्यार्थ्यांना प्रलोभने दाखवताना दिसून येतात.

शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. स्वयं अर्थसहाय्यित आणि अनुदानित खासगी शाळांमध्ये विद्यार्थी पट वाढविण्यासह विद्यार्थी संख्या टिकविण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. त्यासाठी संस्थेकडून शिक्षकांना विद्यार्थी पट वाढीचे उद्दिष्ट दिले आहे. उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी खासगी शाळांचे शिक्षक गट करून विद्यार्थ्यांची शोधमोहीम राबवीत आहेत.

शहरासह तालुक्यात शिक्षक मंडळी विद्यार्थ्यांचे प्रवेश मिळविण्यासाठी धडपड करत आहेत. येत्या १५ जूनपासून शाळा प्रवेशोत्सव सुरू होणार असताना शाळेत अधिकाधिक विद्यार्थ्यांचा प्रवेश करण्यासाठी शिक्षकांची जणू चढाओढच लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

संचमान्यतेच्या नव्या निकषाचा धसका

शालेय शिक्षण विभागाने २०२४-२५ साठी नवीन संच मान्यता निकष जाहीर केले. यापूर्वी १ ते ४ पर्यंतच्या शाळांना दोन शिक्षक मंजूर होते; मात्र नवीन निकषानुसार २१ पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये चार वर्गापर्यंत एकच शिक्षक राहणार आहे.

आठ वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करतो, अगोदर कायम विना अनुदानित आता २० टक्केवर; मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालयात फाइल पुढे सरकत नाही. आतापर्यंत २० हेलपाटे मारले. अधिकारी चुकीची उत्तरे देऊन बोळवण करतात. त्यात वेतन नसताना विद्यार्थी गोळा करण्यासाठी दारोदार भटकंती करावी लागते. हे आमचे दुर्दैव्य म्हणायचे. त्यापेक्षा मजुरी केली ते परवडेल.

- सुनील सानप, विनाअनुदानित शिक्षक

अनुदानासाठी मुंबईला हेलपाटे

तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयात कायम विनाअनुदानित शाळांना २० व ४० टक्के अनुदानावर आणले, तेही दहा वर्षे सेवा होऊन; मात्र अजूनही हे अनुदान मिळाले नाही. शालार्थ आयडीची फाइल लाल फितीच्या कारभारात अडकली, शिक्षक पुण्याला हेलपाटे मारत आहेत. शिक्षक आमदार याबाबत पाठपुरावा करतात; मात्र अधिकारी त्रुटींचा मुद्दा पुढे करतात. त्यामुळे मुंबई अधिवेशन काळात आंदोलन करूनही हातात काहीच नाही. वेतन नसल्याने काही शिक्षक सकाळची शाळा करून दुपारी शेतावर मजुरीला, दुकानात काम करतात. त्यावर त्यांचा प्रपंच सुरू आहे. विद्यार्थी गोळा करण्यासाठी वाडी वस्ती पिंजून काढत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com