जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील खारे पाणी पोहोचले पुणे व नागपूरला; हे आहे कारण...वाचा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

सरोवरातील पाण्यात विशिष्ट प्रकाराच्या हॅलो बॅक्टेरीया व शेवाळाच्या संयोगातून अशा प्रकारचे गुलाबी रंगाचे पाणी होत असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे.

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे अभयारण्य वन विभागाच्या अखत्यारीत आहे. 9 जून रोजी लोणार सरोवराचे पाणी गुलाबी रंगाचे झाल्याची घटना घडली. त्या अनुषंगाने या पाण्याचे शास्त्रीय पध्दतीने नमुने घेण्यात आले आहे. तसेच सदर नमुने संशोधनाकरीता नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविण्यात आल्याची माहिती राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी दिली. लोणार सरोवर हे उल्कापाताने तयार झालेले असून जगातील ते वैशिष्टपूर्ण सरोवर आहे. यातील क्षाराचे प्रमाण जास्त आहे.

सरोवरातील पाण्यात विशिष्ट प्रकाराच्या हॅलो बॅक्टेरीया व शेवाळाच्या संयोगातून अशा प्रकारचे गुलाबी रंगाचे पाणी होत असावे, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. तर काही तज्ज्ञांनी डुनलेलीया अल्गी (Dunaliella algae) व हॅलो बॅक्ट्रेरीया (HaloBacteria) या जीवाणुमुळे बेटा कॅरोटीन रंगद्रव्य निर्माण झाल्याने लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग गुलाबी होत असल्याचे मत व्यक्त केले. इराणमधील क्षारयुक्त सरोवरामध्ये अश्याप्रकारे रंगात बदल झाल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत. या पार्श्वभुमीवर चौकशी करण्यात येत असून अन्य कुठल्याही कृत्रिम घटकामुळे पाण्याचा रंग बदललेला नाही, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.

हेही वाचा - जैविक प्रक्रियेमुळे बदलला लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग; संशोधकांचे मत, यानंतर होणार पूर्वस्थिती

अकोला येथील वन्यजीव विभागाने लोणार सरोवराच्या पाण्याचे शास्त्रीय पध्दतीने नमुने घेण्यासाठी शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयचे डॉ.मिलींद शिरभाते यांना लोणार येथे पाठविले होते. त्यांनी गुलाबी रंगाच्या पाण्याचे व मातीचे नमुने गोळा करून वनविभागाकडे सादर केले आहे. पाण्यातील रंगबदल तपासासाठी सदर नमुने खास दुतामार्फत नागपूर येथील नीरी संस्थेकडे तसेच पुणे येथील आगरकर संशोधन संस्थेकडे पाठविले आहे. 

महत्त्वाची बातमी - अकोला व औरंगाबाद जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला प्रोत्साहन

बुलडाणा शहराच्या दक्षिण पूर्व (आग्नेय) दिशेला 90 किमी अंतरावर लोणार गावालगत उल्कापातामुळे तयार झालेले एकमेव सरोवर आहे. हे सरोवर लोणार अभयारण्यांतर्गत येते. लोणार सरोवर हे बेसॉल्ट खडकातील हायपर व्हेलॉसिटी मेटीयोराईट इम्पॅक्टने तयार झालेले जगातील तिस-या क्रमांकाचे खा-या पाण्याचे सरोवर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 464.63 मीटर असून खोली 150 मीटर आहे. त्याचा आकार अंडाकृती असून पूर्व-पश्चिम व्यास 1787 मीटर तर उत्तर-दक्षिण व्यास 1875 मीटर आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Research will be done on salt water from world famous Lonar Lake at Pune and Nagpur