कौतुकास्पद...टाळेबंदीत कुशल कारागीराने तयार केलीय पारंपरिक शेती साधने, सविस्तर वाचा...

मुकूंद कोरडे
Saturday, 6 June 2020

अकोला जिल्ह्यातील सावरा येथील सुतारकाम करणारे कुशल कारागीर नरेश पुनकर यांनी नव्या पीढीला पारंपरिक शेती साधने, कृषी अवजारे जवळून पाहता यावी या उद्देशाने लॉकडाउनच्या काळात लाकडापासून निर्मित बैलगाडी, तिफन, दमनी, शंकरपटामधील रेंगी, पेरणीयंत्र, वखर, डवरे, कुदळी, विळा, पारंपरिक कंदील व रोज शेतीमध्ये उपयोगाची सर्व शेती अवजारासह विविध 40 प्रकारच्या पारंपरिक वस्तू हुबेहूब तयार केल्या.

अकोट (जि. अकोला) : कोरोनाच्या संकटकाळात सर्व पारंपरिक व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर असताना, टाळेबंदीत कारागीरांच्या हाताला काम नसल्याने अकोला जिल्ह्यातील सावरा येथील सुतारकाम करणारे कुशल कारागीर नरेश पुनकर यांनी नव्या पीढीला पारंपरिक शेती साधने, कृषी अवजारे जवळून पाहता यावी या उद्देशाने लॉकडाउनच्या काळात लाकडापासून निर्मित बैलगाडी, तिफन, दमनी, शंकरपटामधील रेंगी, पेरणीयंत्र, वखर, डवरे, कुदळी, विळा, पारंपरिक कंदील व रोज शेतीमध्ये उपयोगाची सर्व शेती अवजारासह विविध 40 प्रकारच्या पारंपरिक वस्तू हुबेहूब तयार केल्या.

क्लिक करा- अरे देवा! पॉझइटिव्ह रुग्णाच्या घरी कार्यक्रमात सहभाग घेतला, मग काय झाले, वाचा...

परिसरात कुतूहलाचा बनला विषय
आजच्या नवतंत्रज्ञानाच्या युगात लोकांना पारंपरिक वस्तुंचा विसर पडत असताना नवीन पीढीला या वस्तू जवळून पाहता याव्यात, शेतकऱ्यांचे जीवन समजावे या उद्देशाने नरेश पुनकर यांनी तयार केलेल्या वस्तू शाळांना सुट्ट्या असल्याने गावातील बच्चे कंपनीसाठी कुतूहलाचा विषय बनला असून, या पारंपरिक वस्तू पाहण्यासाठी परिसरातील मुले पुनकर यांच्या घरी येऊन सामाजिक अंतर राखत कुतूहलाने पाहत आहेत. पुनकर यांचा पारंपरिक व्यवसाय सुतारकाम काम आहे. कुशल कारागीर असल्याने लाकडाच्या वस्तू, फर्निचर तयार करण्यासाठी त्यांना गावोगावी बोलावल्या जायचे. मात्र, अचानक लॉकडाउन सुरू झाल्याने हातातील सर्व कामच बंद झाले. अशावेळी निर्माण झालेल्या समस्येला संधित रुपांतर करून पुनकर यांनी सर्व पारंपरिक वस्तू तयार करण्याचा निश्‍चय केला व बघता-बघता छोट्या स्वरुपातील सुंदर पारंपरिक वस्तू त्यांनी 50 दिवसात तयार केल्या. या वस्तू दिसायला अंत्यत सुंदर असून, हुबेहूब शेतीतील अवजारांची प्रतिकृती साकारल्या असल्याने घरात शोभेची वस्तू म्हणून ठेवण्यासाठी वस्तुंना मागणी वाढली आहे.

हेही वाचा- अरे वाह! पारंपरिक शेतीकडून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रयोगशिलतेकडे कल; या पिकांची लागवड

परिश्रम करणे गरजेचे
टाळेबंदीत हाताला काम नसल्याची तक्रार न करता समस्येतून संधी शोधावी. परिश्रम केल्याने नक्कीच यश आपल्या पदरी असणार.
-भावना पुनकर, कारागीराची पत्नी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Made replicas of traditional farming tools