थरारक : शेतीचा वाद गेला विकोपाला अन् दोन सख्ख्या भावांचाच काढला काटा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 June 2020

तालुक्यातील सिंदखेड लपाली येथील मोरे कुटुंबीयांत शेतीच्या कारणावरून भाऊबंदकीत वाद झाल्याचे सांगितले जाते.

मोताळा/धामणगाव बढे (जि.बुलडाणा) : शेतीच्या वादातून दोघा सख्ख्या भावांची निर्घृण हत्या झाल्याची घटना शुक्रवारी (ता.12) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास सिंदखेड लपाली येथे घडली. या वादात काही जण जखमी झाले आहेत. या दुहेरी हत्याकांडामुळे तालुकाभरात खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील सिंदखेड लपाली येथील मोरे कुटुंबीयांत शेतीच्या कारणावरून भाऊबंदकीत वाद झाल्याचे सांगितले जाते. दरम्यान, शुक्रवारी दुपारी त्यांच्यात शेतात बोलचाल झाली. त्यानंतर सायंकाळी गावात पुन्हा त्यांच्यातील वाद उफाळून आला. यावेळी गजानन मोरे, उमेश गजानन मोरे, मंगेश गजानन मोरे तसेच सुभाष रामलाल मोरे, त्र्यंबक रामलाल मोरे, सुनील सुभाष मोरे, अनिल मोरे व सहकाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. 

महत्त्वाची बातमी - लहान भावाच्या मृत्यूची वार्ता ऐकली अन् मोठ्यानेही सोडला प्राण

या हाणामारीत सुभाष रामलाल मोरे (वय 53), त्र्यंबक रामलाल मोरे (वय 55) या दोघा सख्ख्या भावांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली. तर, काही जण जखमी झाले आहेत. माहिती मिळताच धामणगाव बढेचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर, पीएसआय योगेश जाधव यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. जखमी सुनील मोरे व अनिल मोरे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृतक सुभाष मोरे आणि त्र्यंबक मोरे हे दोघे सख्खे भाऊ असून, गजानन मोरे हा त्यांचा चुलत भाऊ असल्याची माहिती आहे. 

भाऊबंदकीतील या वादात दोघांचा निर्घृण खून झाल्याची थरारक घटना घडली आहे. दरम्यान, बुलडाणा येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, डीवायएसपी रमेश बरकते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या दुहेरी हत्याकांडामुळे सिंदखेड गावात एकाच हलकल्लोळ झाला असून, तालुकाभरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले असून, वृत्त लिहिपर्यंत धामणगाव बढे पोलिसांची कार्यवाही सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Disputes between families over farming in buldana district akola marathi news