esakal | 1600 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अन् खरिपाच्या तोंडावर पीककर्ज झाले ‘लॉकडाउन’
sakal

बोलून बातमी शोधा

farmers in washim.jpg

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. कडाक्याच्या उन्हात मशागत करून शेतकर्‍यांनी शेती तयार केली आहे.

1600 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अन् खरिपाच्या तोंडावर पीककर्ज झाले ‘लॉकडाउन’

sakal_logo
By
राजदत्त पाठक

वाशीम : यावर्षी खरीप हंगामासाठी शासनाने वाशीम जिल्ह्यात 1600 कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, खरीप हंगाम तोंडावर आला असून सुद्धा आतापर्यंत केवळ 161 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. कर्जवाटपाची राष्ट्रीयकृत बँक व सहकारी बँक प्रशासनाची गती संथ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मे महिना संपत आला तरी सुद्धा खरीप पीक कर्ज योजनेचा केवळ 17 हजार 177 शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे. त्यामुळे उर्वरित शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ कधी मिळणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. कडाक्याच्या उन्हात मशागत करून शेतकर्‍यांनी शेती तयार केली आहे. आता प्रतीक्षा आहे ती पीक कर्ज मिळण्याची. मात्र, राष्ट्रीयकृत बँक व सहकारी बँक प्रशासन विविध कारणे दर्शवून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात असमर्थता दर्शवीत आहेत. परिणामी शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

महत्त्वाची बातमी - ‘त्या’ पोलिस कर्मचाऱ्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले पत्र अन्...

मागीलवर्षी वरुणराजाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद मुग यासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान  झाले. रब्बी हंगामही हातचा गेला.  जे काही पीक हातात आले त्याला बाजारपेठेत भाव मिळाला नाही. त्यातच कर्जमाफीपासून अनेक शेतकऱ्यांना वंचित राहावे लागले. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दरम्यान खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांची पेरणीपूर्व सर्व कामे आटोपली आहेत. आता बी-बियाणे व खतांसाठी शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता आहे.

आवश्यक वाचा - अरे बापरे! सर्वोष्ण शहरांच्या यादीत या शहराचे नाव; जणू काही जगातील उष्णतेचे केंद्र बनन्याकडे...

राज्यामधील राष्ट्रीयकृत व सहकारी बँकामार्फत वाशीम जिल्ह्यातील पीक कर्ज योजनेअंतर्गत 1600 कोटीचे कर्जवितरण करण्याचा इष्टांक ठरविला आहे. यापैकी जिल्हा मध्यवर्ती बँकेने 130 कोटीचे व राष्ट्रीयकृत बँकांनी 31 कोटीचे कर्ज आतापर्यंत वितरित केले आहे. या कर्जयोजनेचा लाभ जिल्ह्यातील केवळ 17 हजार 177 शेतकऱ्यांनाच मिळाला आहे. हे कर्जवितरण अत्यल्प आहे. त्यामुळे बँक प्रशासनाने कर्जवितरणाची गती वाढविण्याची आवश्यक आहे.

शेतकरी आर्थिक संकटात
मागीलवर्षी पावसाच्या लहरीपणामुळे खरीप व रब्बी हंगाम शेतकऱ्यांच्या हातचा गेला. शेतकऱ्यांच्या हातात जे काही पीक आले त्याला बाजारपेठेत योग्य भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. त्यामुळे या खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याची नितांत गरज आहे.  

अन्यथा आंदोलन : मनसे
पीक पेरणीचा नजीकचा काळ तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी व उपलब्ध असलेल्या कमी कालावधी या बाबी विचारात घेऊन राष्ट्रीयकृत बँका व सहकारी बँकांनी कामाची गती वाढवून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही व उद्दिष्टपूर्ती करण्यात यावी. पीक कर्जाबाबत त्वरित कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा. अन्यथा पुढील काळात शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांनी दिला आहे.

जिल्हा उपनिबंधकांचा भ्रमणध्वनी बंद
शेतकऱ्यांना पीक कर्जवाटपाची बँक प्रशासनाची गती संथ का, याबाबत अधिक माहिती घेण्यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांची भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता तो बंद आला.