अरे हे काय! संशयावरून पोलिसांनी गोडाऊनवर छापा मारला अन् ही धक्कादायक बाब आली समोर

rice godown.jpg
rice godown.jpg

बुलडाणा : कोरोना प्रादुर्भाव पाहता शासनाच्यावतीने गरिबांना स्वस्त धान्य दुकानातून माल वितरित करण्यात येत आहे. दरम्यान, या मालावर माफियांनी तस्करी केली असून, काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने एका खोलीत साठवून ठेवलेला शासकीय वितरण प्रणालीचा तांदूळ पोलिसांनी 6 जूनला सायंकाळी भादोला शिवारातील सेंट जोसेफ शाळेजवळील पोल्ट्री फार्म नजीक असलेल्या टीन पत्र्याच्या गोडाऊनवर छापा मारत जप्त केला. या कारवाईत एक लाख 62 हजार 180 रुपयाचा माल जप्त करण्यात आला तर तीन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन यादव हे गस्तीवर असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, पथकासह 6 जूनला सायंकाळी भादोला शिवारातील सेंट जोसेफ शाळेजवळील पोल्ट्री फार्म नजीक असलेल्या टीन पत्र्याच्या गोडावुनवर धाड टाकली. तेथे शासकीय वितरण प्रणालीचा तांदूळ काळ्या बाजारात चढ्या दराने विक्री करण्यासाठी बेकायदेशीर साठवून ठेवलेले आढळून आले. याठिकाणी ऑटो चालक दिलदार जिलानी शहा (वय 38, रा. धोत्रा भनगोजी ता. चिखली), अ‍ॅपे चालक सरदारशहा तुराबशहा (वय 29 रा. वरवंड) हे शासकीय प्रणालीचा तांदूळ काळ्या बाजारात चढ्या भावाने विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणूक करताना मिळून आले.

यावेळी गोडावूनची पाहणी केली असता पांढर्‍या रंगाचे पोत्यांमध्ये साठविलेले तांदूळ मिळून आले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, आमच्या जवळ कोणतेही कागदपत्र नसुन सदर तांदूळ हा  संजय ढोले रा. दूध डेअरी जवळ चिखली यांच्या सांगण्यावरून गावागावात जाऊन लोकांकडून हा विकत घेऊन तांदूळ गोडाऊनमध्ये साठवितो. बुलडाणा ग्रामीणचे पोनी सारंग नवलकार व तहसीलदार यांना याबाबतची माहिती देण्यात आली. 

यावेळी त्यांनी नायब तहसीलदार शाम भांबळे, पुरवठा निरीक्षक भीमराव जुमडे हे घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता सदर तांदूळ शासकीय वितरण प्रणालीचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गोडाऊनमध्ये ठेवलेले तांदळाचे 103 पोते एकूण वजन 46 क्विंटल 12 किलो भरले. त्याची बाजार भावाने एकूण किंमत 69 हजार 180 रुपये व तांदळाची साठवणूक करण्यासाठी वापरण्यात आलेला एक लाल रंगाचा जुना माल वाहू अ‍ॅपे क्र. एम.एच. 20ए.टी.5883 अंदाजे किंमत 50 हजार व एक जुना काळ्या रंगाचा प्रवासी अ‍ॅपे एम.एच.20 सी.एस 1427 अंदाजे किंमत 40 हजार रुपये यासह इलेक्ट्रीक काटा किंमत 3 हजार रुपये असा एकूण 1 लाख 62 हजार 180 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला. 

यावरून आरोपी दिलदार शाह जिलानी शाह (38), सरदार शाह तुराब शाह (29) यांना अटक करण्यात आली आहे. तर संजय ढोले हा पसार झाला आहे. उपरोक्त तिन्ही आरोपी विरुध्द जीवनावश्यक वस्तू अधिनियमनचे कलम 3,7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सारंग नवलकार यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि सचिन यादव हे करीत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com