COVID19 : कोरोनाचा कहर सुरूच; दोन आठवड्यापूर्वी कोरोनामुक्त जिल्ह्यात आता तब्बल ऐवढे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 June 2020

जेमतेम दोन आठवड्यापूर्वी कोरोनामुक्त म्हणून जाहीर झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे.

बुलडाणा : जेमतेम दोन आठवड्यापूर्वी कोरोनामुक्त म्हणून जाहीर झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. शहरी भागांतपुरते मर्यादित असलेले हे लोन आता ग्रामीण भागातही पाय धरू लागले असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज नव्याने जिल्ह्यात सात जण पाॅझिटिव्ह आढळले आहे. यापैकी एक रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील असला तरी तो जालना रुग्णालयात आढळला आहे.

बुलडाणा येथून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 33 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 06 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर मुळच्या सिंदखेडराजा येथील रहिवासी महिलेचा अहवाल जालना येथे पाॅझिटिव्ह आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आलेल्या अहवालांमध्ये 1 महिला व 5 पुरूष आहेत. सदर अहवाल मलकापूर येथील 25 वर्षीय तरुण, साखरखेर्डा ता. सिंदखेड राजा येथील 62 वर्षीय महिला, 44 व 26 वर्षीय पुरूष, 18 वर्षीय तरूण आणि खामगाव येथील 36 वर्षीय पुरूषाचा आहे. साखरखेर्डा येथील कोरोना ग्रस्ताच्या एकाच परिवारातील चार अहवाल आज पाॅझिटिव्ह आल्याने गावाची चिंता वाढली आहे.

हेही वाचा - बच्चू कडू म्हणाले, जनता निष्काळजी, कोरोना वाढण्यास जबाबदार

त्याचप्रमाणे आज चार रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये खामगाव व बुलडाणा येथील कोविड केअर सेंटरमधून प्रत्येकी दोन रूग्णांचा समावेश आहे. खामगांव येथील सुट्टी झालेले रूग्ण चांदुर बिस्वा ता. नांदुरा येथील 12 व 16 वर्षीय मुली आहेत. तसेच बुलडाणा येथून सुट्टी झालेल्यांमध्ये चिखली येथील महिला व निमखेड ता. दे.राजा येथील पुरूष आहे. 

आतापर्यंत 1318 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 75 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तीन मृत आहे. आतापर्यंत 47 कोरोनाबधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 47 आहे.  सध्या रूग्णालयात 25 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार  सुरू आहेत.

तसेच आज 3 जून रोजी 39 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये सहा पॉझिटीव्ह, तर 33 निगेटिव्ह आहेत.  आज रोजी अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 81 आहेत. आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 1318 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two weeks ago Corona free buldana district, now 70 patients