शिवभावे जीवसेवा...तरुणाईने घेतला ‘श्रीं’च्या सेवा कार्याचा आदर्श; कोरोनाच्या संकटात केले हे महत्त्वाचे कार्य

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 June 2020

शेंदला येथील संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने तेथील तरुणांनी आजवर अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविले आहे.

बुलडाणा : शिवभावे जीवसेवा... या संत गजानन महाराज संस्थानच्या सेवा कार्याचा आदर्श घेतल्याचे मेहकर तालुक्‍यातील शेंदला येथील सेवा समितीच्या तरुणांनी कृतीतून दाखवून दिले आहे. आपल्या गावासोबतच जिल्हाभरातील सुमारे 2 लाख 50 हजार लोकांपर्यंत होमीओपॅथीक रोगप्रतिकार शक्तिवर्धक औषधींचे नि:शुल्क वाटप केले.

शेंदला येथील संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने तेथील तरुणांनी आजवर अनेक समाजउपयोगी उपक्रम राबविले आहे. काही डॉक्‍टर मित्रांच्या मदतीने त्यांनी या कोरोना काळातही समाजासाठी काहीतरी करण्याच्या भावनेतून औषधींचे वाटप केले. आयुष मंत्रालयाने रोगप्रतिकार शक्तिवर्धक अर्सेनिक अल्बम 30 या होमीओपॅथीक औषधाला मान्यता दिली आहे. समितीने सर्वप्रथम आपल्या गावातील गावकऱ्यांपर्यंत या औषधींचे शिश्‍या पोचविल्या. 

हेही वाचा - जैविक प्रक्रियेमुळे बदलला लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग; संशोधकांचे मत, यानंतर होणार पूर्वस्थिती

त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे विभागासाठी 3200 शिश्‍या, जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांसाठी 9 हजार शिश्‍या, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी 1000 हजार शिश्‍या, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी 4 हजार शिश्‍याचे वितरण संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांकडे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: जाऊ केले. याशिवाय, जिल्ह्यातील बॅंक, पतसंस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही ही औषधी पुरविण्यात आली. या उपक्रमासाठी वैद्यकीय क्षेत्रातील यश वऱ्हाडे, आनंद बोथरा, ऋषीकेश जवंजाळ, शुभम सूर्यवंशी, अनिकेत भोसले, ऋषीकेश आव्हाळे या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भावी डॉक्‍टरांनी मार्गदर्शन व औषधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न केले.

महत्त्वाची बातमी - अकोला व औरंगाबाद जिल्ह्यात इलेक्ट्रॉनिक क्षेत्राला प्रोत्साहन

‘श्रीं’च्या कार्याचा आदर्श
श्री संत गजानन महाराज हे बुलडाणा जिल्हाच नव्हेतर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. समितीच्या माध्यमातून गावातील तरुण व आमच्या संपर्कातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांना सोबत घेऊन गावाचा विचार न करता संपूर्ण जिल्ह्यातील कोरोना योध्दांसाठी काही तरी करण्याचा विचार पुढे आला. यातून नि:शुल्क औषधी वाटपाची ही संकल्पना समोर आली असून,त्याला सर्वांनी सहकार्य करत सहभागही नोंदविला असल्याचे समिती पदाधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: youth took the ideal of 'Shree's' service work in buldana akola marathi news