बांधकामाच्या नावाखाली ५० वर्षे जुने झाड कापले | Akola | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांधकामाच्या नावाखाली ५० वर्षे जुने झाड कापले

अकोला : बांधकामाच्या नावाखाली ५० वर्षे जुने झाड कापले

अकोला : इमारत बांधकामाच्या नावाखाली बांधकाम किंवा वाहतुकीला कोणताही अडथळा ठरत नसलेले ५० वर्षे जुने निमाचे झाड कापण्यात आले. अकोल्यातील बिर्ला कॉलनीत सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामासाठी मनपा प्रशासनाची दिशाभूल करीत वृक्ष कापण्यात आला. त्याला स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेत मनपा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. बिर्ला कॉलनीत मुख्य रस्त्याच्या कडेला एका भव्य इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या इमारतीच्या व रस्त्याच्यामध्ये ५० वर्षांपेक्षा अधिक जुने वृक्ष आहेत. विशेष म्हणजे, या वृक्षांचा ना वाहतुकीला कोणता अडथळा आहे, ना इमरातीच्या बांधकामात कोणती अडचण येणार आहे. इमारतीच्या बाजूच्या फांद्या तोडल्या तरी भागले असते.

मात्र, मनपा प्रशासनाची दिशाभूल करीत व वृक्ष प्राधिकरण समितीपुढे चुकीची माहिती सादर करून वृक्ष कापण्यात आले. यातील एक महाकाय निमाचा वृक्ष कापल्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मनपा प्रशासनाकडे व वृक्ष प्रेमींकडे याबाबत विचारणा केली. नियमानुसार ५० वर्षांपेक्षा अधिक जुने झाड असेल तर ते कापण्याची परवानगी दिली जात नाही.

हेही वाचा: सोलापूर - औरंगाबाद : महामार्गावर लुटीच्या घटना वाढल्या

असे असतानाही बिर्ला कॉलनीतील बांधकामासाठी वृक्ष कापण्याची परवानगी दिल्याने मनसचे पदाधिकारी सौरभ भगत व आदित्य दामले व वृक्ष प्रेमींनी मनपा प्रशासनाकडे तक्रार दाखल केली. मनपा उपायुक्तांना याबाबत अवगत केले असताना त्यांनी तातडीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे व तोपर्यंत वृक्ष तोड थांबविण्याचे आश्वासन दामले व इतर वृक्षप्रेमींना दिले.

समितीचे काम, ‘आंधळं दळतेय, कुत्र पीठ खाते’

अकोला महानगरपालिकेच्या हद्दतील वृक्षांची अवैध कापणी होऊ नये, नागरिकांना अडचणीच्या ठरणाऱ्या वृक्षांची रितसर परवानगी घेवून, तोडणे अत्यावश्यक असेल तरच परवानगी देण्याच्या दृष्टी मनपात वृक्ष प्राधिकार समिती गठीत करण्यात आली आहे. यात मनपा पदाधिकारी, अधिकारी व शहरातील वृक्षप्रेमी आणि तज्ज्ञांचा समावेश आहे. मात्र, बिर्ला कॉलनीतील वृक्ष तोडण्यासाठी दिलेल्या परवानगीवरून समितीचे कामकाज ‘आंधळं दळतेय, अन् कुत्र पीठ खातेयं’ असे चालं असल्याचा प्रत्यय आला.

loading image
go to top