सोलापूर- औरंगाबाद महामार्गावर लुटीच्या घटना वाढल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्ग

सोलापूर - औरंगाबाद : महामार्गावर लुटीच्या घटना वाढल्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

वाशी : सोलापूर- औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गासह पारडी फाटा (ता. वाशी) येथून भूमकडे जाणाऱ्या महामार्गावर वाहनांना अडवून लूट करण्याच्या घटना मागील काही दिवसांपासून वाढल्या आहेत. परिणामी, पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे.

मागील दोन दिवसांपूर्वी उमरगा (जि. उस्मानाबाद) येथून नाशिक येथे लग्न कार्यासाठी जात असलेल्या वऱ्हाडाच्या लक्झरी बसला शनिवारी (ता. २०) पहाटे पारडी ते भूम रस्त्यावर अडवून चोरट्यांनी लक्झरीच्या पाठीमागील डिग्गीतील वऱ्हाडी मंडळींच्या साहित्याच्या बॅगा लंपास केल्या. घटनेनंतर वऱ्हाडींनी वाशी पोलिसांना माहिती देवून लग्न कार्यासाठी ते पुढे गेले. अद्यापपर्यंत या घटनेची फिर्याद पोलिस ठाण्यात कोणीही दिलेली नाही. परिणामी, चोरीच्या घटनेत चोरीला काय काय गेले? याची खात्रीशीर माहिती मिळू शकलेली नाही. परंतु, या चोरीत वऱ्हाडींच्या कपड्यांच्या बॅगा व काही सोने चोरीला गेल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: जळगाव : एरंडोल पालिकेस ‘थ्री स्टार’ मानांकन

या पूर्वीही या महामार्गावर वाहनांना अडवून प्रवाशांना जबर मारहाण करुण चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तालुक्यातील जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावरील पारडी फाटा येथून भूमकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरु आहे. याच रस्त्यावरून आंध्र प्रदेश तसेच या भागातील भाविक मोठ्या संख्येने शिर्डी येथे दर्शनासाठी जातात. तसेच इतर काही भागातून याच रस्त्यावरून आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक येतात. मात्र, वाढत्या चोरींच्या घटनांमुळे सद्यःस्थितीत परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

"पारडी फाटा ते भूम या रस्त्यावर लक्झरी अडवून करण्यात आलेल्या चोरीप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून काही मुद्देमाल हस्तगत करून चौकशी सुरु आहे. अद्यापपर्यंत फिर्याद आलेली नसल्याने घटनेत चोरीला गेलेल्या मुद्देमालाची माहिती मिळालेली नाही. मिळालेल्या मुद्देमालात कपड्यांचा समावेश आहे."

-रामेश्वर खनाळ, पोलिस निरिक्षक, वाशी

loading image
go to top