Balapur Constituency : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज

लोकसभा निवडणुकीसाठी बाळापूर विधानसभा निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर देण्यात येत असून, गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पाच हजार ८२३ नवमतदारांची वाढ झाली आहे
balapur loksabha election 2024
balapur loksabha election 2024sakal

बाळापूर : लोकसभा निवडणुकीसाठी बाळापूर विधानसभा निवडणूक प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर देण्यात येत असून, गत निवडणुकीच्या तुलनेत यावेळी पाच हजार ८२३ नवमतदारांची वाढ झाली आहे.

एकूण दोन लाख ९९ हजार ३९ मतदार आहेत. त्यापैकी एक लाख ५५ हजार ४३९ पुरुष, तर एक लाख ४४ हजार २९० महिला मतदारांचा समावेश आहे, अशी माहिती बाळापूर विधानसभा निवडणुक प्रमुख तथा उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर अकोला लोकसभा मतदार संघात येणाऱ्या बाळापूर विधानसभा मतदार संघातील मतदारांची आकडेवारी व निवडणुकीच्या अनुषंगाने उपाययोजना आदींची माहिती निवडणूक प्रमुख अनिरुद्ध बक्षी यांनी दिली. यावेळी तहसीलदार वैभव फरतारे व निवडणूक नायब तहसीलदार विजय सुरळकर यांनी निवडणूक कामाचा आढावा घेतला व सूचना केल्या.

बाळापूर मतदारसंघात एकूण ३४० मतदान केंद्रे आहेत. त्यामधे १७३ केंद्रे बाळापूर व १२९ मतदान केंद्रे पातूर तालुक्यात आहेत. तर अकोला तालुक्यातील ३८ मतदान केंद्र बाळापूर विधानसभा मतदारसंघात आहेत.

निवडणूक काळात वाहनांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी बाळापूर येथील बायपास, निंबा फाटा व पातूर तालुक्यातील बोडखा फाटा येथे चेक पोस्टची निर्मिती करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी विधानसभा मतदारसंघांमध्ये तीन भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेचे पालन होण्यासाठी तसेच मतदारांना प्रलोभन दाखविण्यासाठी विविध वस्तूंचा तसेच पैशांचा वापर होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर भरारी पथकांमार्फत विशेष करडी नजर ठेवण्यात येणार आहे. ही पथके उमेदवारांच्या प्रचारसभा, पदयात्रा यावर व्हिडीओ ग्राफी द्वारे नजर ठेवणार आहेत.

दिव्यांग व वृद्धांना घरातून मतदान करण्याची सुविधा

८५ वर्षे पूर्ण झालेले वयोवृद्ध आणि ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी घरातून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत प्रथमच घरातून मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यांचे वय ८५ वर्षे पूर्ण झाले असे नागरिक आणि ज्यांना ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व आहे, अशा व्यक्तींसाठी घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मतदारसंघात ३४० दिव्यांग मतदार आहेत. वयोवृद्ध आणि दिव्यांगांनी मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क बजावण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांच्यासाठी व्हीलचेअरसह तत्सम सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. बाळापूर विधानसभा मतदारसंघांसाठी विविध ठिकाणावरून मनुष्यबळ मागविण्यात येणार आहे. तब्बल एक हजार ८७५ कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात राहणार आहेत.

बाळापूर शहरात नियंत्रण कक्ष

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाळापूर येथील नगरपरिषद सभागृहात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्याठिकाणी असलेल्या ९०९६१४८७८२ या क्रमांकावर तक्रारी स्वीकारला जातील.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com