
यंदाच्या खरिपासाठी हंगाम बीजप्रक्रिया स्पर्धा
अकोला : पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेचे महत्त्व लक्षात घेता बीजप्रक्रिया ही लोकचळवळ होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासन कृषी विभाग व इतर संघटनांच्या संयुक्त विद्यमाने बीजप्रक्रिया स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे.बीजप्रक्रिया ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेती व्यवस्थापनाचा अविभाज्य घटक व्हावा, शेतकऱ्यांमार्फतच याचा प्रचार-प्रसार होण्याच्या दृष्टीने ही स्पर्धा घेतली जात असल्याचे मुख्य कार्यवाह अनंत देशमुख यांनी सांगितले. गेल्या हंगामात राबवलेल्या स्पर्धेत राज्यातील सुमारे सहा हजार ९०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.
दोन हजार ५४० शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या पिकांच्या बियाण्यांच्या बीजप्रक्रियेचे व्हिडिओ बनवून स्पर्धेत सहभाग नोंदवला. स्पर्धेचा कालावधी ता. २५ मे ते ५ जुलै असा आहे. बीजप्रक्रियेचे व्हिडिओ तयार करून जिल्हा समन्वयकांकडे पाठवावेत, असे आवाहन तिफण फाउंडेशनचे प्रदीप भोर यांनी केले आहे.
स्पर्धेचे शनिवारी उद्घाटन
राज्यस्तरावर तीन सर्वसाधारण व तीन महिला असे सहा पुरस्कार, तर प्रत्येक जिल्हास्तरावर दोन सर्वसाधारण व दोन महिला असे चार पुरस्कार आहेत. ज्या कृषी महाविद्यालयाचे किंवा कृषी विद्यालयाचे सर्वाधिक विद्यार्थी सहभागी होतील अशा प्रथम तीन संस्थांना आणि मीडिया, सोशल मीडिया क्रिएटरसाठी राज्यस्तरावर तीन बक्षिसे दिली जातील. या स्पर्धेचे उद्घाटन ता. २१ मे रोजी आदर्श गाव हिवरेबाजार (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील ग्रामसंसद कार्यालयात पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते केले जाईल. यावेळी कृषी विस्तार संचालक विकास पाटील, आरसीएफचे उपमहाव्यवस्थापक मधुकर पाचरणे उपस्थित राहतील, अशी माहिती तिफण फाउंडेशनचे सुखदेव जमधडे यांनी दिली.
Web Title: Agriculture News Kharif Season Government Of Maharashtra Department Of Agriculture Online Organization Of Seed Processing Competition Akola
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..