
अकोला : जिल्ह्यात १ लाख ७३ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट
अकोला : जिल्ह्यात सन् २०२२-२३ च्या पावसाळ्यात एक जुलै ते ३० ऑगस्ट पर्यंतच्या कालावधीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी एक लाख ७३ हजार रोपांची व्यवस्था वन विभाग व सामाजिक वनीवकरण विभागामार्फत करण्यात आली आहे. सदर अभियानात शालेय विद्यार्थी व सामान्य नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात अगोदरच वनराई नाही. गेल्या तीन-चार वर्षात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात हजारो मोठी वृक्षतोड झाली. यामुळे महामार्गाच्या बाजूचा परिसर ओसाड झाला आहे. अनेक मैल गेल्यावरही सावलीसाठी मोठे झाड दिसत नाही. वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना वृक्ष लागवड सक्तीची केली जात नाही. अनेक कंपन्या कागदोपत्री अनेक वृक्ष लागवड दाखवितात. प्रत्यक्षात कमी संख्या असते. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्याचा पारा ४५ अंशावर जावून पोहचतो. सदर प्रकारावर आळा बसावा व मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करता यावी यासाठी जिल्ह्यात १ जुलै ते ३१ ऑगस्टपर्यंत वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी उपवनसंरक्षण वन विभागाकडे २० हजार, सामाजिक वनीकरण विभागाकडे १ लाख ५३ हजार असे एकूण १ लाख ७३ हजार रोपांची व्यवस्था आहे.
तालुकानिहाय उपलब्ध रोपांची संख्या
तालुका रोपांची संख्या
अकोला २६०००
अकोट २५०००
बाळापूर २४०००
बार्शीटाकळी २५०००
मूर्तिजापूर २५०००
पातूर २५०००
तेल्हारा २३०००
एकूण १७३०००
जिल्ह्यात यंदा एक जुलै ते ३० ऑगस्ट दरम्यान वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी रोपे सुद्धा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी वृक्ष लागवड मोहीमेत सहभागी व्हावे.
- बाबासाहेब गाढवे उपजिल्हाधिकारी (रोहयो), अकोला
Web Title: Akola 1lakh 73 Thousand Trees Plantation Special Campaign
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..