

श्रीकांत राऊत, अकोला : महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील जागावाटपाचा तिढा अधिकच गुंतागुंतीचा होत चालला आहे. गेल्या निवडणुकीत तब्बल ४८ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली होती. त्या विजयाच्या जोरावर भाजपने युतीत ‘मोठा भाऊ’ म्हणून वर्चस्वाची भूमिका घेतल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. जागावाटपात कुठेही तडजोड न करण्याची ठाम भूमिका भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून मांडली जात असून, 'आम्ही युतीसाठी तयार आहोत, पण आमच्या अटींवर' असा स्पष्ट संदेशही मित्र पक्षांना दिला जात आहे.