अन...अवंतिकासाठी माणुसकी धावून आली

विरेंद्रसिंह राजपूत
Tuesday, 1 September 2020

चार वर्षीय चिमुरडी अवंतिकाला थैलेसिमिया या आजाराने ग्रासले असून, महिन्यांतून एक वेळ तरी रक्तपेढीतून रक्त घेऊन तिला आपली जीवन परिक्रमा पूर्ण करावी लागत आहे. चिमुरड्या वयातच ओढवलेल्या कठीण प्रसंगावर मात घरण्यासाठी घरच्यांचीही यात घालमेल होत असल्याने माणुसकीची जाण ठेऊन शहरातीलच सेवाभावी कामात अग्रेसर असणाऱ्या चंद्रशेखर आझाद मंडळाने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अवंतिकाला जवळपास २०० रक्तदात्यांकडून रक्त उपलब्ध करून दिले आहे.

नांदुरा (जि.बुलडाणा) :  शहरातील चार वर्षीय चिमुरडी अवंतिकाला थैलेसिमिया या आजाराने ग्रासले असून, महिन्यांतून एक वेळ तरी रक्तपेढीतून रक्त घेऊन तिला आपली जीवन परिक्रमा पूर्ण करावी लागत आहे. चिमुरड्या वयातच ओढवलेल्या कठीण प्रसंगावर मात घरण्यासाठी घरच्यांचीही यात घालमेल होत असल्याने माणुसकीची जाण ठेऊन शहरातीलच सेवाभावी कामात अग्रेसर असणाऱ्या चंद्रशेखर आझाद मंडळाने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून अवंतिकाला जवळपास २०० रक्तदात्यांकडून रक्त उपलब्ध करून दिले आहे.

नांदुरा शहरातील विलास भिंगारकर यांच्या चार वर्षीय चिमुरडी अवंतिकाला थैलेसिमिया या रोगाने ग्रासले आहे. या रोगात रुग्णाच्या शरीरात रक्त बनत नसल्याने बाहेरून रक्त देण्याची गरज भागते. आतापर्यंत विलास भिंगारकर यांनी वेळोवेळी रक्तपेढीतून रक्त घेऊन आपल्या चिमुरडीला लागणाऱ्या रक्ताची गरज भागविली असली तरी त्यासाठी आर्थिक भार तर सहन करावाच लागला मात्र आताच्या कोरोना संसर्गाच्या काळात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने रक्तपेढ्यातही रक्त मिळणे दुरापास्त झाले आहे.

त्यामुळे संकटाच्या या काळात आपल्या चिमुरडीच्या रक्ताची उपलब्धता कशी करावी या चिंतेत सदर कुटुंब असतांना शहरातीलच चंद्रशेखर आझाद मित्र मंडळाने यासाठी पुढाकार घेऊन ३० ऑगस्ट ला छत्रपती शिवाजीराजे चौकातील टाऊन हॉलमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले असता सर्व जातीधर्मातील मानवजातीने उस्फुर्त सहभाग नोंदवत रक्तदान केले.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

तर रक्तपेढीची रक्त संकलन क्षमता कमी असल्याने २०० रक्तदात्यापैकी ८० रक्तदात्यांना रक्त देण्यापासून अलिप्त राहावे लागले.डॉ.हेडगेवार रक्तपेढी अकोला यांनी हे रक्त संकलनाचे काम केले.चंद्रशेखर आझाद क्रीडा व व्यायाम प्रसारक मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे आमदार राजेश एकडे यांनीही या शिबिराला भेट देऊन दिवसभराचा आढावा घेतला.

समाजाच्या व मंडळाच्या पुढाकाराने अखेर कोरोना काळातही रक्तदान शिबिरात अवंतिकासाठी मोठ्या प्रमाणात रक्तदात्यांनी पुढे येऊन समाजकार्यात भाग घेतल्याबद्दल भिंगारकर कुटुंबांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानले.
(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Buldana News 200 blood donors donated on behalf of Azad Mandal