esakal | धरणे भरलेली, रब्बी सिंचनाचे नियोजन नाही; शेतकरी प्रतीक्षेत
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

धरणे भरलेली, रब्बी सिंचनाचे नियोजन नाही; शेतकरी प्रतीक्षेत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकास झाले असले तरी सिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. पिण्याच्या पाण्यासोबत शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांसाठी सिंचनाची सुविधा व उन्हाळ्यातही सिंचनाकतरिता पाणी मिळेल, एवढा साठा झाले आहे. मात्र, पाटबंधारे खात्याने रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी नियोजनचे नसल्याने लोकप्रतिनिधींनी विभागाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

पाटबंधारे विभागाच्या नियोजन शून्य कारभारा बाबत आमदार रणधीर सावरकर यांनी नाराजी व्यक्त करीत येत्या रब्बी हंगामात सिंचनासाठी शेतकऱ्यांना वेळेत पाणीपुरवठा करण्याची मागणी लावून धरली आहे. पाटबंधारे खात्याकडून प्रकल्पाचे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात ता. १५ ऑक्टोबरपासून सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करून देण्याची कोणतीही व्यवस्था नाही.

हेही वाचा: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर?

पाणी वितरणापूर्वी वितरण प्रणाली दुरुस्त करणे आवश्यक आहे. मात्र, ते काम अद्याप सुरू झाले नाही. काटेपूर्णा क्षेत्रातील लाभ क्षेत्रातील पाणी वापर संस्थांच्या सदस्यांनी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या व्यथा लोकप्रतिनिधींसमोर व्यक्त केल्यानंतर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता वसूलकर यांचेशी संपर्क करून प्रकल्पाच्या आगामी रब्बी हंगाम नियोजनाबाबत त्यांचे कक्षात बुधवार, ता. १३ ऑक्टोबर रोजी आढावा बैठकीचे नियोजन करण्यात आले होते.

बैठकीची वेळ विभागाकडून पूर्व नियोजित करून सुद्धा कार्यकारी अभियंता यांना शासकीय कामाचे व्यस्ततेमुळे उपस्थित राहणे शक्य झाले नाही. प्रकल्पाशी संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांचे समवेत आ. रणधीर सावरकर यांनी पाणी वापर संस्थांच्या समस्या तसेच रब्बी हंगामात विहित वेळेत पाणी पुरवठा करण्यासाठीचे नियोजनाची काटेकोर अमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्यात. काटेपूर्णा प्रकल्पासह जिल्ह्यातील वाण, निर्गुणा,मोर्णा तसेच सर्व माध्यम लघु प्रकल्पाच्या रब्बी नियोजनाची माहिती घेतली. बैठकीस दिगंबर पाटील गावंडे, संजय गावंडे, राजू पाटील बढे, जयकुमार ठोकळ, अल्लाउद्दीन शेख, अनिल गावंडे, पंकज वाडीवले, नितिन राजवैद्य आदी उपस्थित होते.

कालवे दुरुस्तीचे नियोजन शून्य

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कालव्यांना पावसामुळे भेगा पडणे, गाळ साचणे, काटेरी झुडपे उगवल्याने तातडीने दुरूस्तीती गरज आहे. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना रब्बी पिकाशिवाय पर्याय नाही. शेतात उभ्या असलेल्या तुरीचे पिकास ऑक्टोबर अखेरीस पाणी पुरवठा झाल्यास चांगले उत्पन्न होऊ शकते. असे उपस्थित शेतकऱ्यांनी संगितले. मात्र रब्बी हंगामात पाटबंधारे खात्याचे वेळेत पाणी पुरवठा करण्यासाठी कोणतेही नियोजन दिसून आले नाही. कालवे दूरस्तीचे कामास अद्यापही मंजुरी नसल्याने पाणी पुरवठा करण्यास उशीर होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेवून कालवे दुरुस्तीसाठीई विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक मोहिते तसेच अधीक्षक अभियंता राठी यांचे सोबत आ. रणधीर सावरकर यांनी चर्चा केली.

loading image
go to top