
अकोल्यात पावसाची जोरदार ‘बॅटिंग’; दोन तासात १२२ मि.मी. पाऊस
अकोला : यंदाच्या मॉन्सूनमध्ये अकोला जिल्ह्यातील काही भागात प्रथमच पावसाने जोरदार ‘बॅटिंग’ केली. अकोला शहरात सोमवारी रात्री दोन तासात १२२.८ मिलीमीटर पाऊस पडला. बाळापूर तालुक्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मोर्णा नदीला पूर येऊन हातरून ते बोरगाव बैराळेपर्यंतच्या गावांचा संपर्क तुटला होता. दुसरीकडे अकोट, तेल्हारा, पातूर व मूर्तिजापूर तालुक्यासह अकोला तालुक्यातील बहुतांश परिसर मात्र कोरडाच आहे. त्यामुळे काही भागात शेती कामांना वेग आला असून, शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त झाला आहे.
अकोला जिल्ह्यातील काही भागात रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेली असून, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. जिल्ह्यात बाळापूर व अकोला तालुक्यातील बाळापूरकडील भागात मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला. बाळापूर तालुक्यातील हातरूण परिसरातील माेर्णा नदीला पूर आला.
त्यामुळे हातरूण ते बाेरगाव वैराळे या गावाचा संपर्क तुटला होता. मांजरी ते बादलापूरकडे जाणाऱ्या पुलाच्या बाजूची जमीन क्षतीग्रस्त झाला. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. अकोला तालुक्यातील बोरगाव मंजू व परिसरात पावसाचा जोर कमी होता. अकोला शहरात मात्र पावसाने तुफान ‘बॅटिंग’ केली. त्यामुळे सखल भागात पाणी साचले.
कुठे खोळंबा, कुठे पेरणी पाण्याखाली!
यंदा खरीप हंगामात जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात. मात्र, त्यानंतर पावासाने दांडी मारल्याने अनेक भागात पेरण्या खोळंब्यात. जमिनीची पेरणीलायक ओल नसल्याने पावसाची प्रतीक्षा होती. त्यानंतरही काही भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. साेमवारी रात्री जिल्ह्यातील काही भागात झालेल्या जाेरदार पावसाने पेरणी झालेली शेतं पाण्याखाली गेले. परिणामी शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचे संकट उभे झाले आहे.
अकोला शहरात अतिवृष्टी
अकोला शहरात सोमवारी रात्री ८ वाजतानंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. रात्री ९ ते ९.३० वाजतानंतर पावसाचा जोर वाढला. त्यानंतर दोन तासात झालेल्या तुफान पावसाने संपूर्ण शहरातील सखल भाग पाण्याखाली गेला होता. हवामान खात्याकडे सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत एकूण १२२.८ मि.मी. पावसाची नोंद झाली. शहरात अतिवृष्टी झाल्याने अनेक नाले तुटुंब भरून वाहले. डाबकी रोड, उमरी, शिवणी आदी परिसरातील रस्त्यावर पाणी साचले आहे.
बाळापूरमध्ये सहा मंडळाला पावसाने झोडपले
बाळापूर तालुक्यातील चार मंडळात सोमवारी रात्री अतिवृष्टी झाली. त्यामुळे या भागात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये बाळापूर (८३ मि.मी.), पारस (८३.मि.मी.), व्याळा (९९ मि.मी.), निंबा (७६.३ मि.मी.) या मंडळांचा समावेश आहे. याशिवाय वाडेगाव (४९.८ मि.मी.) आमि उरळ बु.(४९ मि.मी.) परिसरात तुफान पाऊस झाला. हातरूण मंडळात २४.३ मि.मी. पावसाची नोंद झाली.
जिल्ह्यातील पावसाची स्थिती!
बाळापूर तालुक्यातील हातरूण, शिंगाेली, मालवाडा परिसरात जाेरदार पाऊस झाला. नदी काठच्या शेतात पाणी घुसल्याने शेत जमीन खरडून गेली.
मांजरी ते बादलापूरकडे जाणाऱ्या पुलाचे काम पूर्ण झालेले नाही. गतवर्षीही पावसामुळे पूल क्षतीग्रस्त झाला हाेता. त्यामुळे त्यावर मुरुम टाकण्यात आला हाेता. मात्र, साेमवारी रात्री झालेल्या पावसामुळे पूलाजवळची जमीन वाहून गेली.
गायगाव परिसरातील काही ठिकाणी घरात पाणी घुसले. शेतात पाणी साचले असून, जमीन खरडून गेली. पेरणीवर पाणी फेरल्या गेल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
बाळापूर तालुक्यात साेमवारी रात्री ते मंगळवारी सकाळी १० पर्यंत ६६.३० मि.मी. पाऊस झाला.
जिल्ह्यात सरासरी १५.८ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली.
Web Title: Akola District Rain Batting 122 Mm
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..