esakal | Akola: बळीराजाच्या स्वप्नाचा चुराडा; भाव पडले अन् मालही गेला
sakal

बोलून बातमी शोधा

farmer-crop

अकोला : बळीराजाच्या स्वप्नाचा चुराडा; भाव पडले अन् मालही गेला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रिसोड : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी नीतीचा तसेच, निसर्गाच्या अवकृपेचा बळीराजाला चांगलाच फटका बसला आहे. १२ हजार रुपये क्विंटल सोयाबीनला भाव सुरू असतानाच केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात सोयापेंड आयात केल्याने सोयाबीनचा भाव अवघ्या साडेचार हजारावर येऊन ठेपला आहे. यंदाच्या पावसाळ्यात सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बळीराजांनी रंगविलेले सोनेरी स्वप्नं भंग झाली आहेत.

यंदा भरघोस उत्पन्न पीकवून डोईवर असलेले बँकेचे, सावकारी कर्ज फेडून मुला- मुलींचे शिक्षणाबरोबर त्यांचे लग्न करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या रिसोड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे. त्यासाठी घेतलेल्या कर्जाचे साधे व्याज देता येणार नाही अशी, बिकट परिस्थिती निसर्गाच्या लहरीपणामुळे बनली आहे. विवाहयोग्य मुलीचे हात पिवळे कसे करायचे? व अशा खडतर प्रसंगातून संसाररुपी गाडा कसा हाताळायचा? याच विवंचनेत देशाचा पोशिंदा समजणारा शेतकरी राजा आज मरणासन्न अवस्थेत जगत आहे.

हेही वाचा: New Delhi : औद्योगिक उत्पादनात तेजीचे वारे

शासनाने सध्या राज्यात गाजत असलेला सारीपाटाचा खेळ दूर सारून शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे व त्यांना आर्थिक सक्षम कसे करता येईल? याची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. कोरडवाहू शेतीवर अवलंबून असणाऱ्या बळीराजाला कधी अतिवृष्टी, कधी अवर्षणाचा फटका गेल्या दशकापासून बसत आहे. यंदा बियाणे, रासायनीक खते यासह सोयाबीनच्या बियाणांच्या किमतीत विक्रमी वाढ झाल्याने पेरणी करताना शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. एकीकडे महागडे बियाणे, रासायनीक खते असताना केलेली पेरणी फिस्कटली व दुबार, तिबार पेरणीचे संकट म्हणून शेतकऱ्यांच्या समोर उभे ठाकले होते. पुन्हा सावकाराचे उंबरठे झिजवत दुबार पेरणी केली. निसर्गाच्या कोपामुळे या- ना- त्या कारणाने सावकाराचे व बँकेचे कर्ज फेडता येईल एवढे सोयाबीन, मूग या पिकांचे उत्पन्नही बळीराजाच्या पदरी पडताना दिसत नाहीत.

हेही वाचा: अर्थव्यवस्थेला बळकटी : औद्योगिक उत्पादनात ११ टक्के वृद्धी

पंचनामे झाले गायब

शासनाच्या नियमानुसार ६५ मिलीमीटर पाऊस झाला तर, तो अतिवृष्टीत बसतो. गत पंधरा दिवसांपासून दररोज मुसळधार पाऊस बरसत आहे, निकषाची मर्यादा ओलांडली आहे. तीस टक्के जमिनीवर अजूनही पाणी आहे. उभ्या सोयाबीनला कोंब फुटले आहेत. मात्र, जिल्ह्यात कोठेच पंचनामे होताना दिसत नाहीत. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी घोषणा केली मात्र, आदेश आले नसल्याने प्रशासन आदेशाची वाट बघत आहेत. तर, शेतकरी पावसाच्या उघडीपीची वाट बघत आहे.

loading image
go to top