अकोला : १२५ ग्रामपंचायतींच्या २०७ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Gram Panchayat by vacant post Voting

अकोला : १२५ ग्रामपंचायतींच्या २०७ रिक्त पदांसाठी पोटनिवडणूक

अकोला : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. कार्यक्रमानुसार १२५ ग्रामपंचायतींच्या २०७ रिक्त पदांकरीता पाच जून रोजी मतदान तर ६ जून मतमोजणी करण्यात येईल. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींमध्ये आचारसंहिता सुद्धा लागू झाली आहे.

निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सात तालुक्यांतील १२५ ग्रामपंचायतींच्या २०७ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहील.

पोटनिवडणूक कार्याकर्मानुसार तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक ५ मे असून नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया १३ मे पासून सुरू होईल. २० मे पर्यंत उमेदवारांना सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र सादर करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ मे रोजी करण्यात येईल, तर २५ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील.

तसेच निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी करण्याची तारीख २५ मे दुपारी ३ वाजतानंतर असून आवश्यकता असल्यास ५ जून रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. तर ६ जून रोजी मतमोजणी करण्यात येईल. ९ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक निकालाची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.

ओबीसीच्या जागा खुल्या प्रवर्गासाठी

नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या रिक्त जागा भरण्यापूर्वी त्या अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यात येतील. ओबीसीच्या राखीव जागा सर्वसाधारण म्हणजेच खुल्या प्रवर्गात अधिसूचित केल्यानंतर महिलांसाठी ५० टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येतील.

या ग्रामपंचायतींमध्ये होणार पोटनिवडणूक

तालुका ग्रामपंचायत रिक्त पद

तेल्हारा ०६ ०९

अकोट २२ ४९

मूर्तिजापूर ३५ ६१

अकोला २१ २९

बाळापूर १२ १६

बार्शीटाकळी २० ३२

पातूर ०९ ११

एकूण १२५ २०७