Akola Gram Panchayat Election : आज स्पष्ट होणार लढतींचे चित्र! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Gram Panchayat Election

Akola Gram Panchayat Election : आज स्पष्ट होणार लढतींचे चित्र!

अकोला : जिल्ह्यातील २६६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकी अंतर्गत सरपंचाच्या २६६ पदांसाठी एक हजार ३२६ तर सदस्यांच्या २ हजार ७४ जागांसाठी ४ हजार ६६० अर्ज तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आल्यानंतर सरपंच पदासाठीचे सात तर सदस्य पदासाठीचे ४२ उमेदवारी अर्ज अवैध ठरले. अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी निवडणुकीतून माघार घेणाऱ्यांसाठी बुधवार (ता. ७) शेवटचा दिवस आहे. त्यामुळे डमी, अपक्ष व पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचे मत खाणाऱ्या उमेदवारांच्या माघारीसाठी सर्वच पक्षांचे अधिकृत उमेदवार मनधरणी करत आहेत. ही मनधरणी यशस्वी झाल्यानंतर निवडणुकीतील लढतींचे चित्र स्पष्ट होईल.

जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर तालुक्यातील तब्बल २६६ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान तर २० रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सदर ग्रामपंचायतींसाठी २८ नोव्हेंबर पासून प्रत्यक्ष नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. या निवडणुकीत सरपंच पद थेट जनतेतून निवडून देण्यात येणार असल्याने उमेदवार व मतदारांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. गावागावात पुढाऱ्यांनी पॅनल उभे केले असून जातीय समीकरण डोळ्यासमोर ठेवून सरपंच पदाचा उमेदवार निश्चित करण्यात येत आहे. दरम्यान सरपंच व सदस्य पदांसाठी पाच हजार ९८५ अर्ज प्राप्त झाल्याने सदर अर्जांची छाननी तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यामार्फत करण्यात आली. त्यापैकी सरपंच पदासाठीचे सात तर सदस्य पदासाठीचे ४२ उमेदवारी अर्ज अवैध ठरले.

माघारीनंतर चिन्हांचे वाटप आज

ग्रामपंचायतींच्या सदस्य व सरपंच पदांसाठी प्राप्त अर्जांची छाननी सोमवारी (ता. ५) करण्यात आली. त्यानंतर उमेदवारी अर्ज ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ पर्यंत मागे घेता येतील. याच दिवशी दुपारी ३ वाजता नंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. मतदान १८ डिसेंबर, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता पर्यंत करता येणार असून, मतमोजणी २० डिसेंबर राेजी हाेणार आहे.

असे आहेत अवैध ठरलेले अर्ज

तालुका सरपंच सदस्य

तेल्हारा ०१ ०४

अकाेट ०० ०५

मूर्तिजापूर ०२ ०५

अकाेला ०१ १४

बाळापूर ०२ ०४

बार्शीटाकळी ०१ ०३

पातूर ०० ०७

एकूण ०७ ४२