Akola : सहा सरपंच व ३० सदस्य पदांसाठी मतदान आज

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक; उद्या मतमोजणी
Akola Gram Panchayat General Election
Akola Gram Panchayat General Election sakal

अकोला : अकोट तालुक्यातील पाच व बाळापूर तालुक्यातील एक अशा एकूण सहा ग्राम पंचायतींच्या सरपंच पदासह ३० सदस्यांच्या रिक्त जागांसाठी रविवार (ता.१८) मतदान पार पडणार आहे. दरम्यान अकोट मधील अमोना ग्रा.पं. येथे सरपंच पदाची निवड अविरोध झाली असून सोमठाणा याठिकाणी अनुसूचित जाती (महिला) प्रवर्गातून एकही उमेदवार नसल्याने याठिकाणी सरपंच पदाची जागा रिक्त राहली.

जानेवारी २०२१ ते मे २०२२ या कालावधीत मुदत संपलेल्या आणि जून २०२२ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्‍याने स्‍थापित ग्रामपंचायतीच्‍या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यात अकोट तालुक्यातील सात तर बाळापूर तालुक्यातील एका ग्रामपंचायतचा समावेश आहे. ७० रिक्त जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये १४९ नामनिर्देशन पत्र दाखल केले होते, तर छाननीत तिघांचे अर्ज बाद करण्यात आले.

दरम्यान ३० जागांसाठी ११५ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये ६३ पुरुष व ५२ स्त्री उमेदवारांचा समावेश आहे. त्यापैकी सहा सरपंच पदासाठी २१ उमेदवारांमध्ये सामना रंगणार आहे. मतदान रविवारी (ता. १८) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल, तर सोमवार (ता. १९) मतमोजणी होणार आहे.

११ हजार मतदार करणार मतदान

सहा ग्रामपंचायतींच्या सरपंचासहित ३६ रिक्त पदांसाठी आज मतदान पार पडणार असून यामध्ये अकोट तालुक्यातील धारूर रमापूर मधील २५८९, गुल्लरघाट ३८०, कासोद शिवपूर १६०२, धारगढ ३४७, पोपटखेड १६५४ बाळापूर मधील व्याळा ग्रामपंचायतचे ४५४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

२६ जण अविरोध

आठ ग्रामपंचायतच्या ७० जागांसाठी होवू घातलेल्या निवडणुकीत २६ उमेदवारांची निवड बिनविरोध करण्या आली. त्यापैकी १४ जागा रिक्त आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात तीस सदस्य व सहा सरपंच पदासाठी २४ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

सरपंच पदासाठी २१ उमेदवार रिंगणात

अमोनामध्ये सरपंच पदासाठी अनुसूचित जमाती पदाची जागा राखीव असून याठिकाणी एका उमेदवाराचा अर्ज बाद झाल्याने अविरोध निवड झाली आहे. सोमठाणा मध्ये अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून एकही उमेदवार नसल्याने ही जागा रिक्त राहली आहे. उर्वरित कासोद शिवपूर येथे दोन, धारूर रामापूर येथे चार, पोपटखेड येथे चार, धारगड येथे तीन गुल्लरघाट मध्ये दोन तर बाळापूर तालुक्यातील व्याळा येथे सहा असे एकूण सहा सरपंच पदांसाठी एकवीस उमेदवार रिंगणात आहेत.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com