Akola Gram Panchayat : उपसरपंचाची होणार आज निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Akola Gram Panchayat Upsarpanch will elected today politics

Akola Gram Panchayat : उपसरपंचाची होणार आज निवड

अकोला : जिल्ह्यातील २६५ ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच व सदस्य निवडणुकीची प्रक्रिया पार पडल्यानंतर आता संबंधित ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंच पदाची निवडणूक घेण्याचा कार्यक्रम जिल्हा प्रशासनाने जाहीर केला होता.

त्यानुसार १८७ ग्रामपंचायतींमध्ये ४ जानेवारी रोजी होणाऱ्या पहिल्या सभेतच उपसरपंच पदाची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून घडामोडी अनेक ग्रामपंचायतींचे सदस्य हे पर्यटनाला गेले आहेत.

जिल्ह्यातील अकोला, तेल्हारा, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, मूर्तिजापूर, पातूर तालुक्यातील तब्बल २६६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार सदर ग्रामपंचायतींपैकी एक ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने उर्वरित २६५ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० वाजतापासून जिल्ह्यातील ८३२ मतदान केंद्रांवर मतदान घेण्यात आले.

दिवसभर चाललेल्या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्साह दाखवल्यामुळे जिल्ह्यात सरासरी ८०.२५ टक्के मतदान होऊ शकले. मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर सर्व ईव्हीएम सील करुन रात्री संबंधित तालुक्यातील मतमोजणी ठिकाणी गोदामात ठेवण्यात आल्या होत्या. मतमोजणी २० डिसेंबर रोजी सुरु झाली व सरपंच पदासह सदस्य पदाचे निकाल जाहीर करण्यात आले.

त्यानंतर आता संबंधित ग्रामपंचायतींमध्ये उपसरपंचाच्या निवडीची सभा ही दोन टप्प्यांमध्ये म्हणजेच ४ जानेवारी २०२३ व ६ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात १८७ ग्रामपंचायतींमध्ये बुधवारी (ता. ४) ग्रामसभा होणार असून त्यामध्ये उपसरपंचाची निवड करण्यात येईल.

उपसरपंच निवड होत असलेल्या ग्रामपंचायती

तालुका ग्रामपंचायती

पातूर १४

बाळापूर २६

तेल्हारा २३

बार्शीटाकळी ३४

अकोट ३७

अकोला २७

मूर्तिजापूर २६

दोन्ही बाजूकडून जोरदार प्रयत्न

- उपसरपंच पदाची निवड सभेत हाेणार आहे. त्यामुळे निवडीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी सरपंच आणि विजयी झालेले सदस्य विराेधी गटाचे आहेत.

- सरपंच गटाकडून आपलाच उपसरचंप कसा हाेईल, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सरपंच पद हातातून गमावेला गट किमान उपसरपंच तरी आपल्याच गटातील व्हावा, यासाठी प्रयत्न करत आहे.

- राजकीय पक्षाच्या नेत्यांकडूनही आपलाच समर्थक उपसरपंच कसा हाेईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.