
जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू असून योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ९८६ खातेदारांचे अद्यापही आधार प्रमाणिकरण झालेले नाही.
अकोला : जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सुरू असून योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ९८६ खातेदारांचे अद्यापही आधार प्रमाणिकरण झालेले नाही.
अशा पात्र लाभार्थ्यांना अखेरची संधी म्हणून सोमवारी (ता. ४) विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे सहाय्यक निबंधक एस.डब्ल्यू. खाडे यांनी दिली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीमध्ये कर्ज घेतलेल्या व ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत व्याजासह दोन लाखांपर्यंत थकीत कर्जाची रक्कम संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यावर शासनामार्फत वर्ग करण्यात येते. या योजनेअंतर्गत संबंधित बॅंकांनी कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर शेतकऱ्यांचा डाटा भरलेला असून त्यांची छाननी करुन पात्र शेतकऱ्याच्या याद्या पोर्टलवर उपलब्ध आहेत.
हेही वाचा - उद्ध्वस्त खरीपावर सरकारी माेहाेर; शेतकऱ्यांना मिळणार सवलती
ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करणे शिल्लक आहे अशा पात्र लाभार्थ्यांसाठी सोमवारी (ता. ४) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक (प्रशासन) एस. डब्ल्यू. खाडे यांनी केले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील २४ डिसेंबर २०२० अखेर एक लाख १५ हजार ६७६ खाती अपलोड करण्यात आली आहेत.
त्यापैकी एक लाख एक हजार २९४ खातेदारांना विशिष्ट क्रमांक देण्यात आला आहे. त्यापैकी ९९ हजार ३०८ पात्र खातेदारांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले आहे. अद्याप १९८६ पात्र खातेदारांचे प्रमाणिकरण शिल्लक आहे. दरम्यान महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी यादीतील शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम जमा होण्याची कार्यवाही सुरू होते.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
असे आहेत प्रमाणिकरण रखडलेले लाभार्थी
अकोला तालुक्यातील ४३०, अकोट - २६९, बाळापूर - ४५९, बार्शीटाकळी - १३७, मूर्तिजापूर - २७१, पातूर - १५० व तेल्हारा तालुक्यातील २७० अशा एकूण १९८६ पात्र खातेदारांचे आधार प्रमाणिकरण करणे शिल्लक आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या सी.एस.सी. किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे.
(संपादन - विवेक मेतकर)