लुटीचा बाजार: शेतकऱ्यांची ज्वारी १० अन् व्यापाऱ्यांची ३० रुपये किलो

अनुप ताले 
Tuesday, 12 January 2021

धावपळीच्या व व्यस्त जीवनचर्येमध्ये हलका आहार म्हणून ज्वारीची भाकर खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र, एकेकाळी गव्हापेक्षा निम्म्या पटीने स्वस्त असणारी ज्वारी, आता दीडपट महाग झाली आहे.

अकोला : धावपळीच्या व व्यस्त जीवनचर्येमध्ये हलका आहार म्हणून ज्वारीची भाकर खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. मात्र, एकेकाळी गव्हापेक्षा निम्म्या पटीने स्वस्त असणारी ज्वारी, आता दीडपट महाग झाली आहे.

एवढेच नव्हे, तर वर्षभर आणि आताही व्यापारी शेतकऱ्यांकडून ती १० रुपये किलोने खरेदी करून, नागरिकांना ३० रुपये किलो प्रमाणे विकत असल्याने, शेतकऱ्यांसोबतच सामन्याची लूट होत आहे.

हेही वाचा - आधारच अपडेट नाही तर कशी मिळणार कर्जमुक्ती, अजून चार हजार शेतकऱ्यांचे आधार अपडेशन बाकी

दोन ते तीन दशकांपूर्वी महाराष्ट्रात आहारात मुख्य पदार्थ म्हणजे ज्वारी. ज्वारीची भाकरी, धिरडे, पिठले, ज्वारीच्या पिठाची पेस, ज्वारीचे पापड आदी पदार्थ नागरिकांची आवड होती. ज्वारीचे पदार्थ सहज पचणारे असल्याने, आरोग्यही सुदृढ राहायचे.

परंतु, जसा काळ सरकरत गेला तसा शेती व पिकांची महाराष्ट्रातील स्थिती बदलत गेली. मुख्यतः अकोला जिल्ह्यासह वऱ्हाडात ज्वारीचे पिक झपाट्याने घसरले व त्याची जागा, गव्हाने घेतली. आहारात ज्वारी गरिबासाठी व गहू श्रीमंतांसाठी, असे वर्गीकरण व्हायला लागले. त्यामुळे ज्वारीचा पेरा घसरत गेला.

हेही वाचा - ‘कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी’, कान्हेरीच्या विठ्ठलाने शेतीलाच केले ‘पंढरी’​

परंतु, धकाधकीच्या जीवनचर्येत, व्यायाम, क्रीडा, आरोग्यासाठी वेळ मिळत नसल्याने, सहज पचणारे अन्न घेण्याचा सल्ला डॉक्टर व आहारतज्ज्ञांकडून मिळायला लागला. त्यामुळे पुन्हा ज्वारीची मागणी वाढली मात्र, त्यातुलनेत उत्पन्न नसल्याने, गव्हापेक्षाही जास्त किंमत ज्वारीला आली. मागणी वाढत असल्याचा फायदा मात्र, व्यापाऱ्यांना झाला आहे.

वर्षभर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून केवळ ९०० ते हजार रुपये प्रतिक्विंटल दराने व्यापारी ज्वारी खरेदी करीत असून, हिच ज्वारी सामान्यांना ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकली जात आहे. सध्याही बाजार समितीमध्ये ९०० रुपये प्रतिक्विंटल दराने ज्वारी खरेदी केली जात आहे.

हेही वाचा - जिल्हा परिषदेची बियाणे वितरण योजनेत पाच हजार शेतकरी लाभापासून वंचितच!

ज्वारीच्या पेरणीतील अडथळा
ज्वारीची धान्य म्हणून व कडब्याची चाऱ्यासाठी मागणी वाढल्याने या पिकाचा पेरा वाढायला पाहिजे होता. परंतु, ज्वारीची पेरणी केल्यानंतर जंगली डुक्कर, हरीन, पक्ष्यांच्या सुळसुळाटामुळे मोठ्याप्रमाणात नुकसान होते. शिवाय उत्पन्नही इतर पिकांच्या तुलनेत कमी मिळत असून, व्यापारी अल्पदरात ज्वारी खरेदी करत असल्याने, शेतकरी ज्वारी पेरण्यासाठी धजावत नाहीत.

(संपादन - विवेक मेतकर)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Akola Marathi News- Loot Market: Farmers Sorghum 10 and Traders Rs 30 per kg