
यंदा जिल्ह्यात पावसामुळे साेयाबीन, कापाशीसह इतर पिकांचे आताेनात नुकसान झाले. हाता-ताेंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे.
अकाेला : यंदा जिल्ह्यात पावसामुळे साेयाबीन, कापाशीसह इतर पिकांचे आताेनात नुकसान झाले. हाता-ताेंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या या स्थितीला खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीने सुद्धा माेहर लावली असून जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. ओल्या दुष्काळावर पैसेवारीने सुद्धा मोहर लावल्याने आता शेतकऱ्यांना सरकारी सवलती मिळण्याची शक्यता आहे.
यावर्षी खरीप हंगामात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे काढणीला आलेले सोयाबीन व कापूस ओलाचिंब झाला. साेयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले. मूंग, उडीदावर कीटकांनी हल्ला केल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पिक गेले. पावसामुळे तोडणीला येणारा कापूस, त्याचे बोंड ओले झाल्यामुळे गळून पडण्यासारखी स्थिती झाली होती.
ज्वारी पिकाचे सुद्धा नुकसान झाले. कर्ज काढून पेरणी केल्यामुळे आता उत्पन्न अल्प हाेणार असल्याने कर्ज कसे फेडावे, वर्षभर संसाराचा गाडा कसा हाकावा, पावसामुळे खरडून गेलेली जमीन व्यवस्थित करुन पुढील मशागतीसाठी पैसा काेठून आणावा, असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमाेर उभे राहिले. सततच्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला असतानाच बळीराजाच्या या स्थितीवर पैसेवारीने सुद्धा शिक्कामाेर्तब केले आहे. पिकांच्या स्थितीवर ठरणारी जिल्ह्यातील खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ओल्या दुष्काळावर सुद्धा शिक्कमोर्तब झाल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - मुलांनी झिडकारलं तरी सापडला आशेचा किरण, मुलांनी बेदखल केलेल्या आईला मिळाला आधार
पैसेवारीचा संबंध दुष्काळाशी
खरीप पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करत असतो. पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशाच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज, ऑक्टाेबरमध्ये सुधारित व ३१ डिसेंबररोजी पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. पैसेवारीच्या आधारावर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवत असते.
पिकांची स्थिती गंभीर
पैसेवारी ५० टक्क्याच्या खाली निघाल्यास पीक परिस्थिती ‘गंभीर’ व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती ‘उत्तम’ हे पैसेवारीचे समीकरण आहे. दरम्यान जिल्ह्यात १०१२ गावे असून, त्यातील ९९० गावे खरीप पिकांची लागवडी याेग्य आहेत. त्यामुळे यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या तपासणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा
६७ पैसे हाेती सुधारित पैसेवारी
जिल्हा प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी सरासरी ५० पैशांपेक्षा अधिक जाहीर केली हाेती. त्यानंतर सुधारित पैसेवारी ६७ पैसे जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सवलती मिळण्याची शक्यता मावळली हाेती. दरम्यान आता जिल्ह्याची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे जाहीर करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती मिळण्याची शक्यता वाढली आहे.
खरीप पिकांची अंतिम पैसेवारी
तालुका गाव पैसेवारी
अकाेला १८१ ४६
अकाेट १८५ ४८
तेल्हारा १०६ ४५
बाळापूर १०३ ४७
पातूर ९४ ४८
मूर्तिजापूर १६४ ४७
बार्शीटाकळी १५७ ४८
एकूण ९९० ४७
(संपादन - विवेक मेतकर)